मुंबई : हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर, बिल भागवण्यासाठी तुम्ही जर तुमचं एटीएम/डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वेटरकडे देऊन, त्यालाच पिन नंबर देत असाल तर, सावधान. कारण त्याचा मोठा फटका बसू तुम्हाला शकतो.

वेटरला पिन नंबर दिल्यामुळे बदलापूरच्या एका कुटुंबाला एक-दोन नव्हे तर तब्बल 81 हजार रुपयांना फटका बसला आहे. हे कुटुंब एका हॉटेलमध्ये गेलं होतं. मात्र त्यानंतर तीन दिवसांनी अज्ञाताने त्यांच्या अकाऊंटमधील तब्बल 81 हजार रुपये काढल्याचं उघड झालं आहे.

हॉटेलमधील वेटरनेच काही अफरातफर केली असेल, अशी शंका या कुटुंबाने व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

बदलापूरमधील सांगळे कुटुंब गेल्या महिन्यात 18 ऑगस्टला जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेलं होतं. कुटुंबातील 8 सदस्यांनी स्थानिक हॉटेलमध्ये जेवण केलं. जेवणानंतर वेटर 1760 रुपयांचं बिल घेऊन आला. सूर्यकांत सांगळे यांनी बिलापोटी रोख पैसे न देता त्यांचं डेबिट कार्ड दिलं. मात्र वेटरने नेटवर्कचं कारण देत, एटीएम स्वाईप करण्यासाठी काऊंटरला जावं लागेल असं सांगितलं. त्यासाठी त्याने डेबिट कार्डचा पिन नंबर मागितला. सांगळे यांनीही नंबर दिला.

तीन दिवसांनी 81, 000 गायब

वेटरने बिलापोटी 1760 रुपये कापून डेबिट कार्ड सांगळेंना परत आणून दिलं. मात्र तीन दिवसांनी सांगळे यांच्या अकाऊंटमधून तब्बल 81 हजार रुपये गायब झाले. सांगळे यांच्या मोबाईलवर विविध ट्रान्झॅक्शन झाल्याचे मेसेज आले.

तातडीने बँकेत, पोलिसात धाव

अकाऊंटमधून 81 हजार रुपये गायब झाल्याचं लक्षात येताच सांगळे यांनी त्याबाबतची कल्पना त्यांच्या मुलीला दिली. त्यांनंतर दोघांनी तातडीने कॅनरा बँकेत धाव घेतली. बँकेने त्यांना डेबिट कार्ड ब्लॉक करण्याचा आणि पोलिसात तक्रार दाखल करण्याच सल्ला दिला.

यानंतर मग सांगळे यांनी स्थानिक बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. बदलापूर पोलिसांनी ठाणे सायबर सेलशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. मात्र महिनाभरानंतरही पोलीस योग्य तपास करत नसल्याचं सांगळे यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे आमचा तपास सुरु आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. वेटरची चौकशी केली मात्र काहीही पुरावे नसल्याने त्याला अटक करु शकत नाही. या ट्रान्झॅक्शनसाठी जो नंबर वापरण्यात आला, तो बिहारमधील असल्याचं ट्रेस झालं, मात्र आम्ही पत्ता शोधत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं.

तिकडे हॉटेल मालकांनी आम्ही पोलिसांना सहकार्य करत असल्याचं सांगितलं. पोलिसांनी सीसीटीव्ही मागितलं होतं. मात्र आमच्याकडे 5 दिवसांचंच फुटेज सेव्ह असतं. त्यामुळे मागील महिन्यातील फुटेज आमच्याकडे नाही, असं हॉटेल मालकांनी सांगितलं.