मुंबई : तुम्ही सिंगल असाल, तर मिंगल होण्यासाठी फेसबुक मदत करणार आहे. फेसबुक लवकरच डेटिंग फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे.
या वर्षअखेरीस फेसबुक अॅपवर डेटिंग फीचर सुरु होणार आहे. आतापर्यंत अनेक जणांनी फेसबुकवर नवी नाती जुळवली आहेत, काही जणांनी लगीनगाठही बांधली आहे, पण आता अधिकृतरित्या तुम्हाला डेटिंग पार्टनर शोधता येईल.
नव्या फीचरच्या माध्यमातून यूझर्स आपला लव्ह इंटरेस्ट शोधण्यासाठी डेटिंग प्रोफाईल तयार करु शकतात. फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने सॅन होजेमधील कॉन्फरन्समध्ये मंगळवारी ही घोषणा केली.
सध्याची फेसबुक प्रोफाईल आणि डेटिंग प्रोफाईल तुम्हाला वेगवेगळ्या ठेवता येतील. विशेष म्हणजे तुमच्या डेटिंग प्रोफाईलबाबत फेसबुक फ्रेण्ड्सनाही थांगपत्ता लागणार नाही. डेटिंग प्रेफरन्स, म्युच्युअल फ्रेण्ड्स या निकषांवर तुम्ही योग्य जोडीदार शोधू शकाल.
लाखो फेसबुक यूझर्सना डेटा लीकचा फटका बसल्याची भीती निर्माण झाल्यानंतर फेसबुकने केलेली ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
टिंडर, ओकेक्युपिड, बम्बल, हिंज यासारख्या डेटिंग अॅप्सना टक्कर देण्यासाठी हे फीचर फेसबुक लाँच करत आहे. फक्त हुकअप्स नाही, तर लाँग टर्म रिलेशनशीपसाठी हे अॅप वापरलं जावं, अशी आशा झुकरबर्गने व्यक्त केली.