कॅलिफोर्निया : फेसबुक लवकरच आपलं डेटिंग फीचर लाँच करणार आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने अॅन्युअल डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्समध्ये याची घोषणा केली. या डेटिंग फीचरच्या माध्यमातून फेसबुक टिंडरला टक्कर देणार आहे.


या डेटिंग फीचरबाबत बोलताना झुकरबर्ग म्हणाला की, 'एक रियल आणि लाँग-टाइम रिलेशनशीप लक्षात ठेऊन हे फीचर तयार करण्यात आलं आहे.'

'आम्हाला असं वाटतं की, फेसबुक यूजर्सची खरी नाती या माध्यमातून तयार व्हावीत. यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच यूजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता याकडे लक्ष दिलं आहे. तुमच्या मित्रांना तुमचे डेटिंग प्रोफाईल पाहता येणार नाही.' असं झुकरबर्ग म्हणाला.

कसं असणार फेसबुकचं डेटिंग फिचर?

चीफ प्रोडक्ट ऑफिसर क्रिस कॉक्स यांनी याबाबत सांगताना अशी माहिती दिली की, 'हे फीचर यूजर्स आपल्या मर्जीने निवडू शकतील.' यावेळी एक डेमो प्रोफाईलही दाखवण्यात आलं.

'यूजर्ससाठी हे फीचर फेसबुक प्रोफाईलपेक्षा वेगळं असणार आहे. हे फीचर यूजरच्या पहिल्या नावाचा वापर करेल. म्हणजेच तुमच्या आडनावाचा यामध्ये वापर होणार नाही. जे यूजर्स डेटिंग फीचरचा वापर करतील त्यांनाच तुमचं प्रोफाईल दिसणार आहे.' असं क्रिस कॉक्स म्हणाले.

'जेव्हा एखादा यूजर डेटिंगसाठी दुसऱ्या प्रोफाईलपर्यंत पोहचेल. त्यावेळी दुसरीकडूनही त्याला प्रतिक्रिया येईल. अशावेळी दोन्ही यूजर मेसेजच्या माध्यमातून बोलू शकतील. हे चॅट बॉक्स मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपच्या प्रोफाइलपेक्षा वेगळं असणार आहे.' अशीही माहिती कॉक्स यांनी दिली

फेसबुकच्या घोषणेनंतर टिंडरचे शेअर घसरले

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, फेसबुकने डेटिंग फीचरची घोषणा केल्यानंतर टिंडरची ओनर कंपनी मॅच ग्रुपचे शेअर तब्बल 21% घसरले.