नवी दिल्ली : 2020 पर्यंत 5 लाख भारतीयांना डिजिटल स्किल शिकवणार असल्याचं फेसबुकने जाहीर केलं आहे. कंपनीकडून एका नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, जो स्टार्टअप म्हणून आणि वैयक्तिक स्तरावर फायद्याचा असेल.
फेसबुकने भारतात दोन उपक्रमांची सुरुवात केली. ज्यामध्ये फेसबुक डिजिटल ट्रेनिंग आणि फेसबुक स्टार्टअप ट्रेनिंग हब यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांची सुरुवात फेसबुकने भारतातूनच केली आहे.
फेसबुक डिजिटल ट्रेनिंग म्हणजे काय?
हा एक ऑनलाईन ट्रेनिंग हब आहे. ज्याद्वारे सोशल आणि कंटेट मार्केटिंगचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत कुणीही याचा लाभ घेऊ शकतं. कंटेंट कसं तयार करायचं, ते वाचकांपर्यंत कसं पोहोचवायचं हे यामध्ये शिकवलं जाईल. याशिवाय अनेक डिजिटल स्किलचा यामध्ये समावेश आहे.
फेसबुक स्टार्टअप ट्रेनिंग हब म्हणजे काय?
या ऑनलाईन ट्रेनिंग हबमुळे डेव्हलपर्स आणि स्टार्टअप्सला फायदा होईल. प्रभावी पद्धतीने व्यवसाय करणं आणि चांगल्या प्रोडक्टचे प्रकार यामध्ये सांगितले जातील. व्यवसाय नियोजन, वस्तूंची निर्मिती आणि व्यवसाय विस्ताराबाबत यामध्ये शिकवलं जाईल.