सॅन फ्रान्सिस्को : सायबर हॅकर्सनी आपल्या 5.7 कोटी यूजर्स आणि ड्रायव्हर्सचा डेटा चोरल्याचे, उबरने सांगितलं. विशेष म्हणजे, तब्बल एक वर्षाचा हा गुप्त डेटा चोरलेल्यानंतर तो नष्ट करण्यासाठी कंपनीला एक लाख डॉलर (भारतीय चलनानुसार 64 लाख 92 हजार पाचशे रुपये) भरावे लागले आहेत.


कंपनीचे सीईओ दारा खोसरोवशही यांनी सांगितलं की, “असं व्हायला नको होतं, आणि त्यासाठी मी यावर कोणतीही कारणं देणार नाही.” तसेच हा प्रकार उघड झाल्यानंतर, उबरच्या डेटा सुरक्षा टीमच्या दोन सदस्यांना तत्काळ कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.

या दोघांनीही वेळेवर कस्टमर केअरला याबाबतची माहिती न दिल्याने, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

खोसरोवशही यांनी सांगितलं की, “एका अज्ञाताने कंपनीकडून वापरण्यात येणारं क्लाउड सर्व्हर हॅक करुन मोठ्या प्रमाणात डेटा डाऊनलोड केला. यात यूजर्सची नावं, त्यांचे ई-मेल, मोबाईल नंबर आणि जळपास सहा लाख ड्रायव्हर्सची नावं आणि त्यांचे लायसेंस नंबर चोरण्यात आले.”

कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं की, हा प्रकार उघड झाल्यानंतर चोरलेला डेटा नष्ट करण्यासाठी कंपनीला एक लाख डॉलर भरावे लागले आहेत. तर दुसरीकडे कंपनीचे यूजर्स आणि ड्रायव्हर्सना डेटा सुरक्षेविषयी याची माहिती दिलेली नाही.