मुंबई : सोशल मीडियातील जायंट मानल्या जाणाऱ्या फेसबुकने आपल्या यूझर्ससाठी एक नवं फीचर आणलं आहे. खरंतर फेसबुक नेहमीच प्रत्येक अपडेटमध्ये वेगळे फीचर लॉन्च करत असतं. मात्र, यावेळी थोडं इंटरेस्टिंग असं फीचर आहे. फेसबुक ऑटो प्ले व्हिडीओ हे नवं अपडेट दिलं आहे.


काय आहे अपडेट?

आतापर्यंत काय होतं की, फेसबुकवरील व्हिडीओ ऑटो प्ले व्हायचे. मात्र, आवाज यायचा नाही. ऑडिओ म्युट असायचा. मात्र, आता नव्या अपडेटनुसार फेसबुकवरील व्हिडीओ ऑटो प्ले झाल्यानंतर ऑडिओही सुरु होईल. त्यासाठी वेगळं क्लिक करण्याची गरज यूझर्सना पडणार नाही.

यूझर्सना त्रास होण्याची शक्यता

फेसबुकच्या नव्या अपडेटचा म्हणजेच ऑटो प्ले व्हिडीओसबत ऑटो प्ले ऑडिओही, याचा यूझर्सन त्रास होण्याची शक्यता आहे. कारण अनेकजण अत्यंत शांत ठिकाणी किंवा महत्त्वाच्या ठिकाणी जिथे आवाज होता कामा नये, अशा ठिकाणीही फेसबुकवरील पोस्ट, फोटो पाहत असतात आणि फेसबुक स्क्रोल करत असतात, तर अशावेळी व्हिडीओसोबत ऑडिओही प्ले होईल.

 सायलेंट मोडवर असताना ऑडिओ ऑटो प्ले नाही!

फेसबुकने या अपडेटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवलीय, ती म्हणजे फोन सायलेंट मोडवर असताना ऑटो प्ले ऑडिओ नाही होणार. त्यामुळे यूझर्सना थोडा दिलासा मिळाला आहे.

नवं फीचर डिसेबल करण्याची सुविधा

ज्या यूझर्सना ऑटो व्हिडीओ-ऑडिओ प्लेची ही सुविधा नको असेल किंवा या फीचरमुळे त्रास होत असेल, तर हे फीचर डिसेबल करण्याची सुविधाही देण्यात आलीय. फेसबुकच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑटो प्ले ऑफ करता येणार आहे.

‘वॉच अँड स्क्रोल’ फीचर

फेसबुकने यूझर्ससाठी ‘वॉच अँड स्क्रोल’चं फीचरही आणलं आहे. या फीचरमुळे फेसबुकवरील एखादा व्हिडीओ पाहत असताना न्यूज फीडही पाहणं शक्य होणार आहे. स्मार्टफोनच्या एका कोपऱ्यात व्हिडीओ ड्रॅग करुन न्यूज फीड पाहता येईल.

फेबसुक व्हिडीओ टीव्हीवर!

आणखी एक महत्त्वाची घोषणा फेसबुककडून करण्यात आलीय. फेसबुकवरील व्हिडीओ टीव्हीवर पाहता येणार आहेत. त्यासाठी टीव्ही अॅपची घोषणा केलीय. अॅपल टीव्ही सॅमसंग टीव्ही आणि अमेझॉन टीव्ही यांसोबत फेसबुकचं अॅप जोडता येईल, अशी माहिती मिळतेय.