मुंबई : डेटा चोरी प्रकरणी फेसबुकला ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने दणका दिला आहे. डेटा चोरी प्रकरणी ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने फेसबुकवर पाच लाख पाऊंडचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीला कोट्यवधी लोकांचा व्यक्तीगत डेटा पुरवल्याचा आरोप फेसबुकवर आहे.
ब्रिटीश संसदेच्या मीडिया समितीने डेटा चोरी प्रकरणाचा तपास केला होता. या तपासात फेसबुकने आपल्या युजर्सची माहिती केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीला पुरवल्याचं निष्पन्न झालं.
डेटा चोरी प्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी फेसबुकला 5 लाख पाऊंड म्हणजे 4.56 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या फेसबुक कंपनीसाठी हा दंड किरकोळ आहे. मात्र फेसबुकने नियमांचं उल्लंघन केलं त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचं होतं.
ब्रिटनने केलेल्या कारवाईनंतर इतर देश फेसबुकविरोधात काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.
काय आहे प्रकरण?
2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'केम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला, असाही आरोप आहे.
केम्ब्रिज अॅनालिटिका ही ब्रिटनस्थित कंपनी आहे. या कंपनीमुळेच फेसबुकवरील युजर्सच्या माहितीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.