न्यूयॉर्क : प्रत्येक क्षणाला फेसबुक अपडेट पाहणाऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण फेसबुकचा भरमसाठ वापर, तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा निष्कर्ष एका नव्या संशोधनात नोंदवण्यात आला आहे. अमेरिकेतील येल विद्यापीठ आणि कॅलिफोर्नीया, सॅन डिएगोच्या विद्यार्थ्यांनी याबाबतचं संशोधन केलं आहे.


यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांनी 2013 ते 2015 दरम्यान पाच हजार 208 जणांचा अभ्यास केला. यात फेसबुकच्या वापरामुळे त्यांचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? हे तपासलं गेलं.

या प्रदीर्घ अध्ययनानंतर फेसबुकचा भरमसाठ वापर करणाऱ्या व्यक्तींचा सामाजिक, शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे, ज्या व्यक्ती स्वत:ची फेसबुक प्रोफाईल सरासरीपेक्षा जास्त पाहतात, त्यांना मानसिक आजाराचा धोका संभवत असल्याचा निष्कर्षही या डॉक्टरांच्या चमूने नोदंवला आहे.

फेसबुक संदर्भातील हा संशोधनाचा आहवाल यूसीएसडीचे सहाय्यक प्राध्यपक आणि येल विद्यापीठाचे निकोलस क्रिस्ताकिस यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला आहे. हा अहवाल अमेरिकन जर्नल ऑफ अॅपिडेमियोलॉजी या पत्रिकेत प्रकाशित करण्यात आला आहे.

नोट : एबीपी माझाने या अहवालाच्या दाव्याची पडताळणी केली नाही. त्यामुळे ते अंमलात आणण्यापूर्वी तुम्ही डॉक्टारांचा सल्ला नक्की घ्यावा.