मुंबई : नोकियाने एचएमडी ग्लोबलसोबत बाजारात कमबॅक केलं आहे. त्यामुळे नोकियाच्या आगामी स्मार्टफोनची सर्वांनाच उत्सुकता आहे. नोकियाच्या आगामी फोनचं नाव नोकिया 9 असेल, असं बोललं जात आहे. या फोनविषयी वेगवेगळी माहिती समोर आली आहे.

नोकियाचा हा नवा स्मार्टफोन बेंचमार्क वेबसाईट गीकबेंचवर 'अननोन हार्ट' या कोडसह दाखवण्यात आला आहे. यापूर्वी लाँच झालेले नोकिया 3 आणि नोकिया 5 हे स्मार्टफोन हार्ट या कोडनेमसह स्पॉट करण्यात आले होते. नोकियाचा हा प्रीमिअम स्मार्टफोन असेल, असा अंदाज लावला जात आहे.

या फोनमध्ये 8 जीबी रॅम असेल अशीही चर्चा आहे. असं झाल्यास 8 जीबी रॅम असणारा हा जगातील पहिलाच स्मार्टफोन असेल. दरम्यान वनप्लसचा आगामी स्मार्टफोन वनप्लस 5 मध्येही 8 जीबी रॅम असण्याची शक्यता आहे.

या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आणि 5.7 इंच आकाराची स्क्रीन असेल, असा दावाही काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी लीक झालेल्या एका माहितीनुसार या फोनमध्ये 5.5 इंच आकाराची स्क्रीन आणि 6 जीबी रॅम असेल, असा दावा करण्यात आला होता.

बॅटरी आणि कॅमेरा या फोनची खास वैशिष्ट्य असण्याची शक्यता आहे. कारण या फोनमध्ये 22 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल, असा दावा करण्यात आला आहे. तर क्विक चार्जिंग 4.0 सपोर्टसह 3800mAh क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे.