मुंबई : सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय तो म्हणजे ‘फेसअ‍ॅप’. सोशल मीडियात फेसअ‍ॅपमधील 'ओल्ड एज फिल्टर' जगभरात लोकप्रिय झाले असून वायरल होत आहे. भारतात तरुणांना ते त्यांच्या म्हातारपणी कसे दिसतील याची उत्सुकता असतेचं. या फेसअ‍ॅपच्या मदतीने तरुणांना आपण म्हातारपणी कसे दिसू हे कळून येते आहे. या फेसअ‍ॅपची क्रेझ सामान्य तरुणांपासून ते सेलिब्रिटी सर्वांनाच आहे.


रशियन डेव्हलपर्सनी हे फेसअॅप तयार केलेलं असून यामध्ये न्यूरल नेटवर्क्सचा वापर करुन चेहऱ्यावर विविध फिल्टर्स लावता येतात. 2017च्या प्रारंभी याला पहिल्यांदा आयओएस आणि नंतर अँड्रॉइड प्रणालीसाठी सादर करण्यात आले होते. अल्पावधीतच याला चांगली लोकप्रियता लाभली. यात कुणीही आपला फोटो अपलोड करुन हवे ते बदल करु शकतो. हा बदललेला फोटो फेसबुक, ट्विटरसह अन्य सोशल साईटवरुन शेअर करता येते.

फेसअॅपमध्ये आणखी काही सुविधासुद्धा उपलब्ध आहेत, जसे की एखाद्या फोटोमध्ये म्हातारे असाल तर तरुण दिसण्याचा फिल्टर, तरुण असाल तर म्हातारे झाल्यावर कसे दिसू शकाल हे दाखवणारा फिल्टर, चेहऱ्याची स्टाईल बदलणारा फिल्टर.

या अॅपने सामान्य लोकांनाच नाही, तर सिनेसृष्टीतील अभिनेत्यांनाही वेड लावलं आहे. वरुण धवन, अर्जुन कपूर यांसारख्या अभिनेत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे एडीट केलेले म्हातारपणातील फोटो शेअर केले आहेत.

मध्यंतरी या अ‍ॅपवर वर्णद्वेषाचा आरोप करण्यात आल्यामुळे ते वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. यामुळे त्यांना हॉट तसेच अन्य काही फिल्टर्स काढून माफी मागावी लागली होती. यामुळे फेसअ‍ॅपच्या लोकप्रियतेला ग्रहण लागल्याचे दिसून आले होते.