मुंबई : भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2जी, 3जी आणि आता 4जीची चलती आहे. मात्र, आता याही पुढे जात 5जी येत आहे. स्वीडनमधील एरिक्सन कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे.
भारतात एकीकडे सुपरफास्ट स्पीड आणि व्हॉईस-व्हिडीओच्या आकर्षक सुविधा देण्यासाठी 4जीचा प्रसार केला जात आहे. रिलायन्स जिओने तर 4जीच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. तर दुसरीकडे 5जी तंत्रज्ञानही भारतात पाऊल टाकण्यासाठी तयार झाले आहे.
स्वीडनस्थित एरिक्सन या टेलिकॉम उपकरणं बनवणाऱ्या कंपनीने भारतात 5 जी तंत्रज्ञान आणण्यासाठी आयआयटी दिल्लीसोबत हातमिळवणी केली आहे. एरिक्सन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, "एरिक्सन आणि आयआयटी दिल्लीने भारतात 5जी तंत्रज्ञान आणण्यासाठी करार केला आहे."
या करारानुसार एरिक्सन 5 जी तंत्रज्ञानासाठी सुरुवातील एक परीक्षण केंद्र स्थापन करणार आहे. त्याचसोबत आयआयटी दिल्लीत एक सेंटरही सुरु केले जाणार आहे, ज्या माध्यमातून देशात 5 जी तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.
याच वर्षी जून महिन्यानंतर 5 जी तंत्रज्ञानासाठी पहिलं परीक्षण केले जाईल. 2020 पर्यंत 5 जी तंत्रज्ञान व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
याआधी नोकिया आणि भारती एअरटेलनेही 5 जी तंत्रज्ञानासाठी भागिदारीची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात 5 जी तंत्रज्ञान प्रत्यक्षात येईल, यात शंका नाही.