मुंबई : फ्लिपकार्टने नो रिफंड पॉलिसी मागे घेतली आहे. ग्राहकांची संख्या कमी होत असल्याच्या चिंतेने कंपनीने काही लोकप्रिय श्रेणीमध्ये ही पॉलिसी पुन्हा लॉन्च केली आहे.

फ्लिपकार्टने वेबसाईटवरुन खरेदी केलेली उत्पादनं परत करण्याच्या मोबदल्यात रिफंड देणं नुकतंच बंद केलं होतं.

या उत्पादनांवर रिटर्न ऑफर मिळणार
पण कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता पुस्तकं, होम हेकॉर अँड लाईफस्टाईल, फॅशन प्रॉडक्ट्स, फिटनेस इक्विपमेंट, म्युझिक इन्स्ट्रुमेंटसह इतर उत्पादनांवर आता रिफंड मिळवू शकतात. याआधी ग्राहक ही उत्पादनं केवळ रिप्लेस करु शकत होते.

या उत्पादनांवर रिफंड मिळणार नाही!
मात्र कंपनी आताही मोबाईल फोन, फर्निचर, एअर कंडिशनर, वॉशिंग मशिन, टेलिव्हिजन यांसारख्या मोठ्या अप्लायन्स आणि स्मॉल अप्लायन्ससारख्या दुसऱ्या लोकप्रिय कॅटेगरीतील उत्पादनांवर रिफंड देत नाही.

परंतु कंपनीच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, "फ्लिपकार्टची रिटर्न पॉलिसी फारच कस्टमर फ्रेण्डली आहे. एक वर्षांच्या काळात कंपनीच्या रिटर्न पॉलिसीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आमच्या ग्राहकांनी कायमच फ्लिपकार्टवर कोणत्याही अडचणीशिवाय रिटर्न एक्स्पीरिअन्सचा लाभ घेतला आहे. पण सत्य परिस्थिती अशी आहे की, ग्राहक फ्लिपकार्टवर 1800 कॅटेगरींपैकी सुमारे दोन तृतीयांशसाठी थेट वेबसाईटद्वारे रिफंडचा आग्रह करु शकतात."

क्लोदिंग, फूटवेअर, आयवेअर आणि फॅशन अॅक्सेसरीज यांसारख्या निवडक कॅटेगरीत उत्पादनं बदलण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला जात होता, यात या कॅटेगरीमधील वस्तू बदलता येत होते.

भारतीय ग्राहकांना ऑनलाईन शॉपिंगकडे आकर्षित करण्यासाठी मागील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत 'फुल रिफंड अँड नो क्वेश्चन आस्क्ड रिटर्न पॉलिसी' लॉन्च केली होती.

दरम्यान, फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर मागील वीकेण्डला पॉलिसी अपडेट करण्यात आली. आता साईटवर 'नो रिफंड ऑफर्ड. ऑल सेल्स आर फाइनल' असा उल्लेख नाही.