मुंबई : सध्याच्या काळात डिजिटल तंत्रज्ञान हे जीवनाचा अविभाज्य भाग झालं आहे. डिजिटलायझेशनमुळे सामान्य व्यक्तींच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा धांडोळा घेण्यासाठी 'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यंदा या कार्यक्रमाचं चौथं वर्ष आहे.

राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एबीपी माझाच्या 'ब्लॉग माझा स्पर्धा 2018' चा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर आणि 'अक्षरनामा'चे संपादक राम जगताप यांनी काम पाहिलं.

वाचा :

एबीपी माझा आयोजित #ब्लॉगमाझा 2018 स्पर्धेचा निकाल

यंदाच्या 'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र' या चर्चासत्रात डिजिटल एन्टरटेन्मेंट, डिजिटल एज्युकेशन, डिजिटल फ्यूचर आणि चॅलेंजेस ऑफ फेक न्यूज या विषयांवर संबंधित क्षेत्रातील दिग्गज आपलं मत मांडतील. महाराष्ट्राला डिजिटल तंत्रज्ञानाने सक्षम राज्य बनवण्यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत, त्याचा आढावा या कार्यक्रमात घेतला आहे.


डिजिटल एन्टरटेन्मेंट
डिजिटल एन्टरटेन्मेंट विषयावर नितीन पवार (गावाकडच्या गोष्टी वेब सीरिजचे दिग्दर्शक), अमेय वाघ (अभिनेता) आणि निपुण धर्माधिकारी (अभिनेता, दिग्दर्शक) हे चर्चा करतील. तर  सौमित्र पोटे (एन्टरटेन्मेंट हेड, एबीपी माझा) हे या सत्राचे चर्चा समन्वयक असतील आणि त्यानंतर प्रश्नोत्तराचा काळ असेल.

डिजिटल एज्युकेशन
डिजिटल एज्युकेशन विषयावर अनिल सोनूने (शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, औरंगाबाद), दीपाली सावंत (जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, वर्धा), रणजीत दिसले (जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, कदमवस्ती,  ता माढा, जिल्हा सोलापूर) आणि भाऊसाहेब चास्कर (हंगामी शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, अकोले, अहमदनगर) हे आपलं मत मांडतील. या सत्राचे चर्चा समन्वयक हर्षल विभांडिक (इन्वेस्टमेंट बँकर, इंटरनॅशनल कॅपिटल पार्टनर्स) असतील.

डिजिटल फ्यूचर
या विषयावर मानस गजरे (संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, झबुझा लॅब्ज, मोबाईल अॅप मेकिंग अँड मेकिंग कंपनी) आणि दीपक घैसास (अर्थतज्ज्ञ आणि उद्योजक) चर्चा करणार आहेत. तर शेखर पाटील (पत्रकार आणि टेकवार्ताचे संपादक) हे या सत्राचे चर्चा समन्वयक असतील.

चॅलेंजेस ऑफ फेक न्यूज
तर चॅलेंजेस ऑफ फेक न्यूज हे या कार्यक्रमाचं शेवटचं सत्र असेल. ब्रिजेश सिंह (महासंचालक, माहिती आणि प्रसार), निवेदिता निरंजन कुमार (फॅक्ट चेक, बुम लाईव्ह), प्रशांत माळी (वकील) आणि आनंद मांगले (संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते) हे आपल्या चर्चासत्रात चॅलेंजेस ऑफ फेक न्यूजबाबत माहिती देतील.  एबीपी माझाचे मेघराज पाटील या सत्राचे चर्चा समन्वयक आहेत.

'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र'च्या 2017 च्या चर्चासत्रात ई-मनी, ई-शिक्षण, ई-आरोग्य आणि सोशल मीडिया या विषयांवर संबंधित क्षेत्रातील दिग्गजांनी मत मांडलं होतं.