नवी दिल्ली : लवकरच तुम्ही हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही ईमेल अॅड्रेस बनवू शकता. भारत सरकारने त्या दृष्टीने प्रयत्नही सुरु केले आहेत. गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि रेडिफसारख्या अमेरिकन टेक्नोलॉजी कंपन्या तुम्हाला तुमच्या भाषेत ईमेल अॅड्रेस बनवण्याची सुविधा उपलब्ध देणार आहेत.
भारतात ग्रामीण भाग अधिक असल्याने प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल सुविधा उपलब्ध झाल्यास याचा वापर अधिक प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळेच प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस उपलब्ध करुन देण्याची मागणी भारत सरकारने ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांकडे केली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मिनिस्ट्रीचे संयुक्त सचिव राजीव बन्सल यांनी सांगितले की, "येत्या काही वर्षात देशातील 2 लाख 50 हजार ग्रामपंचायती भारत नेट प्रोजेक्टद्वारे जोडल्या जाणार आहेत. मात्र, जेव्हा लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचेल, तेव्हा ते काय करतील? देशात किती लोकांना इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे? त्यामुळे प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस महत्त्वाचा आहे. या संदर्भातील मिटिंगमध्ये गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि रेडीफसारख्या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते."
https://twitter.com/inregistry/status/759996907204730881
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या मिटिंगमध्ये देवनागरीसारख्या इतर भाषांच्या लिपीत ईमेल अॅड्रेस बनवणं शक्य असल्याच्या मतावर सर्वांचं एकमत झालं. मात्र, प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस अनिवार्य करण्याऐवजी कंपन्यांना आपापल्या पद्धतीने सुरुवात करण्याची मुभा द्यायला हवी, असे ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मत मांडले.
आनंदाची बाब म्हणजे मायक्रोसॉफ्टने प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु, असा विश्वास व्यक्त केला आहे. इंटरनेट एक्स्प्लोअर 11, मायक्रोसॉफ्ट एज आणि एमएस आऊटलूक 2016 हे सध्या वापरात असलेले व्हर्जन प्रादेशिक भाषा सपोर्ट करतात. मात्र, आता ईमेलसाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत.
हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस उपलब्ध करुन देण्याची संकल्पना चांगलीच आहे. मात्र, त्याआधी सरकारने इंटरनेटचे दर कमी करायला हवेत, असे मत रेडिफचे सीईओ अजित बालाकृष्णन यांनी मांडले.