12 आयफोन चोरणाऱ्या फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला अटक
एबीपी माझा वेब टीम | 04 Jul 2016 09:49 AM (IST)
चेन्नई : 12 आयफोन चोरणाऱ्या फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. 21 वर्षीय फ्लिपकार्टचा हा डिलिव्हरी बॉय चेन्नईचा रहिवासी आहे. बी नवीन असं त्याचं नाव आहे. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, आरोपी तरुण चायनीज फोन आणि आयफोनची अदलाबदल करायचा. त्यानंतर ग्राहक असमाधानी असल्याचं सांगत फोन गोदामात परत पाठवत असे. नवीन एक महिन्यापासून चोरी करत होता. अशाप्रकारे त्याने एक, दोन नव्हे तर 12 आयफोन लंपास केले. या परिसरातील ग्राहकांच्या आयफोनबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर फ्लिपकार्टने याची चौकशी केली. तपासात ग्राहकांना बनावट फोन दिल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करुन डिलिव्हरी बॉय बी नवीनला अटक करण्यात आली. पोलिसांनी नवीनकडून 5 लाखांपेक्षा जास्त किंमतीचे फोन जप्त केले. या प्रकरणी नवीनची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. कॉलेजमधील लॅव्हिश लाईफस्टाईलमुळे बी नवीनवर कर्ज होतं. त्यामुळेच त्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचं पोलिसांनी सांगितलं.