नवी दिल्ली : स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन, लॅपटॉप बनवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेटाविंड कंपनीने टेक्नोसॅव्हींसाठी एक खास टॅब्लेट बाजारात आणलं आहे. 5 हजार 999 रुपये एवढ्या कमी किंमतीत डेटाविंडने टॅब्लेट उपलब्ध करुन दिला आहे. i3G7 असे या टॅब्लेट पीसीचं नाव आहे. विशेष म्हणजे या टॅब्लेटमध्ये अनलिमिटेड इंटरनेट ब्राऊजिंग अॅक्सेस दिला आहे.   डेटाविंड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह तुली यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले, “नव्या टॅब्लेटच्या माध्यमातून डेटाविंड कंपनी ग्राहकांना टेकनिक आणि स्टायलिश डिव्हाईस देत आहोत आणि तेही स्वस्त दरात. देशातील अधिकाधिक लोकांना डिजिटल युगात आणण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे.”   टॅब्लेट पीसी i3G7 मध्ये 8 जीबीचं इन-बिल्ट स्टोरेज असेल. मात्र, मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने स्टोरेज 32 जीबीपर्यंत वाढवण्याची सोय करण्यात आली आहे. 7 इंचाच्या टॅब्लेटमध्ये इंटेल प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये अँड्रॉईड लॉलिपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टम असून वाय-फाय, ब्लूटूथ आणि मायक्रो-यूएसबी कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एवढ्या कमी किंमतीतील टॅब्लेटला 3G सपोर्टही आहे.   या टॅब्लेटमध्ये 2800 mAh क्षमतेची बॅटरी असून टॉक टाईम 4 तासांपर्यंत आणि स्टँडबाय टाईम पाच दिवसांपर्यंत असेल. यामध्ये एचडी प्लेबॅकचं फीचरही आहे.