मुंबई : भारतीय हवामान विभाग किंवा स्कायमेट यांच्याकडून हवामानाचे अंदाज वर्तवले जातात. बळीराजाला या हवामान अंदाजांचा खूप उपयोग होतो. मात्र, आता जगातील प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकही भारतातील हवामानाचा अंदाज व्यक्त करणार आहे. त्यादृष्टीने फेसबुकने पावलंही उचलण्यास सुरुवात केली आहे.

 

भारतातील काही फेसबुक युजर्सनी जेव्हा फेसबुक अकाऊंट लॉग इन केलं, तेव्हा त्यांना हवामानाचा अंदाज वर्तवणारं फीचर दिसलं. मात्र, फेसबुकने सगळ्याच युजर्ससाठी हे फीचर खुलं केलं नसून काही निवडक युजर्सच्या माध्यमातून या फीचरचं टेस्टिंग केलं जात आहे.

 

जेव्हा युजर फेसबुक अकाऊंट लॉग इन करेल, तेव्हा फेसबुक होमपेजवर गूड मॉर्निंग, गूड अफ्टरनून किंवा गूग इव्हिनिंग असं युजर्सच्या नावासह मेसेज दिसेल. मात्र, नव्या फीचरचा समावेश केल्यानंतर लोकेशननुसार तापमान किती आहे, हेही सांगितलं जाणार आहे.

 

फेसबुकने आतापर्यंत हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या या फीचरबाबत कोणतीही माहिती दिली नाहीय. कारण हे नवं फीचर युजर्सना किती उपयुक्त असेल, याची माहिती फेसबुककडून घेतली जात आहे.

 

युजर्सना आकर्षित करतील अशा काही फीचर्सचं टेस्टिंग फेसबुककडून करण्यात येत आहे, अशी माहिती फेसबुकच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.