नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत मोबाईल अॅप 'नमो'च्या माध्यमातून भारतीयांचा डेटा अमेरिकेतील कंपन्यांना विकला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र हा आरोप केल्यानंतर काँग्रेस पक्ष स्वतःच अडचणीत आला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत अॅपमधून भारतीयांचा डेटा सिंगापूरला जात असल्याचा दावा आता फ्रान्सच्या हॅकरने केला. त्यामुळे काँग्रेस तोंडघशी पडली.


याच फ्रान्सच्या हॅकरच्या दाव्यावर काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. एलियट एल्डरसन या हॅकरने काल नमो अॅपमधून माहिती अमेरिकेत जात असल्याचा दावा केला. तर आज काँग्रेसच्या अॅपमधून डेटा सिंगापूरला जात असल्याचा दावा हॅकरने केला.

राहुल गांधींचा भाजपवर आरोप

राहुल गांधी यांनी फ्रान्समधील हॅकर एलियट एल्डरसन याच्या ट्वीटच्या आधारवर बातमी शेअर केली. नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सचा डेटा थर्ड पार्टीला विकला जात असल्याचा दावा एलियट एल्डरसन या हॅकरने केला.



राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधत ही बातमी शेअर केली आणि डेटा विकला जात असल्याचा आरोप केला. ‘माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. तुम्ही माझ्या अधिकृत अॅपवर लॉग इन करता तेव्हा तुमची सर्व माहिती मी माझ्या अमेरिकन कंपनीतील मित्रांना देतो’, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं.

नमो अॅपवर आरोप, भाजपने काँग्रेसला घेरलं

राहुल गांधींनी ज्या हॅकरच्या आधारावर नमो अॅपवर निशाणा साधला, त्याच हॅकरने आता काँग्रेस पक्षाचं अॅप असुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाच्या मोबाईल अपच्या माध्यमातून जेव्हा पक्षाच्या सदस्यतेसाठी अर्ज करता तेव्हा तुमची माहिती membership.inc.in ला जाते, असं हॅकरने म्हटलंय.


membership.inc.in चा आयपी अॅड्रेस 52.77.237.47. सिंगापूरमधील आहे. तुम्ही एक भारतीय राजकीय पक्ष आहात. त्यामुळे तुमचं सर्व्हर भारतात असणं अधिक योग्य आहे, असा उपरोधिक सल्लाही हॅकरने काँग्रेसला दिला.

हॅकरने भाजपला टीकेची आयती संधी दिल्यानंतर भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. नमो अॅपवर आरोप करणाऱ्या काँग्रेसने स्वतःचंच अॅप प्ले स्टोअरवरुन डिलीट केलं, अशी माहिती मालवीय यांनी दिली. विशेष म्हणजे नमो अॅप डिलीट करण्यासाठी राहुल गांधी स्वतः आवाहन करत आहेत.



काँग्रेसचं स्पष्टीकरण

हॅकरच्या दाव्यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी तातडीने स्पष्टीकरण दिलं. आम्ही अॅपच्या माध्यमातून सदस्यत्व देत नाही. वेबसाईटच्या माध्यमातून सदस्यत्वाचा अर्ज करता येतो, ज्याचं सर्व्हर मुंबईत आहे, असं स्पष्टीकरण दिव्या स्पंदना यांनी दिलं.


फेसबुक डेटा लीकनंतर काँग्रेस-भाजपचे आरोप-प्रत्यारोप

कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने फेसबुकच्या माध्यमातून युझर्सची वैयक्तिक माहिती चोरल्याचं समोर आलं होतं. फेसबुकनेही आपली चूक झाली असल्याचं मान्य केलं. त्यामुळे तुमचा-आमचा डेटा सोशल साईट्सवर किती सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेस 2019 च्या निवडणुकीची तयारी कॅम्ब्रिज अॅनालिटिकासोबत करत असल्याचा आरोप केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधणं सुरु केलं. कायदेमंत्री खोट्या बातम्या पसरवत असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते.