मुंबई : गूगल नेहमीच आपल्या डूडलद्वारे कलात्मकत पद्धतीने दिग्गज व्यक्तींना आणि त्यांच्या कार्याला सेलिब्रेट करतं. गूगलने आज रेनकोटच्या उद्गात्याला अर्थात चार्ल्स मॅकिन्टॉश यांना डूडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. जगाला रेनकोटची देणगी देणाऱ्या चार्ल्स मॅकिन्टॉशची आज 250 वी जयंती आहे.


स्कॉटलंडमधील ग्लासगोव्हमध्ये राहणारे चार्ल्स मॅनिन्टॉश हे केमिस्ट होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केमिस्टकडे काम सुरु केले. कामावरुन घरी आल्यानंतर रसायनशास्त्राचा अभ्यास करायचे. मग यातील नव्या शोधांचा अभ्यास करणे किंवा त्यासंबंधी कार्यक्रम, व्याख्यानांना उपस्थिती लावणे असं त्यांचं सुरु असे.

एकदा एका कार्यक्रमात चार्ल्स यांना कोळसा आणि नाफ्तापासून रबरचा वापर करता येईल, अशा तंत्रासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी रेनकोटच्या शोधाला सुरुवात केली. लोकरीच्या दोन अस्तरांना वितळवलेल्या रबरने जोडले आणि अस्तर शिवून कोट बनवला. चार्ल्स मॅकिन्टॉशचा हा पहिला-वाहिला रेनकोट जगभरात प्रचंड प्रसिद्ध झाला. त्यानंतर मूळ रेनकोटमध्ये सुधारणाही केल्या.

29 डिसेंबर 1766 रोजी जन्मलेल्या चार्ल्स मॅकिन्टॉश यांचं 25 जुलै 1843 रोजी निधन झालं. भारतासोबत गूगलने चार्ल्स मॅकिन्टॉश यांचं डूडल अमेरिका, कॅनडामध्ये गूगलच्या होम पेजवर दाखवण्यात येत आहे, तर युरोप आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांमधील गूग सर्च इंजिनच्या होमपेजवरही चार्ल्स मॅकिन्टॉश यांचं डूडल आहे.