Call Recording android apps banned : मुंबई : कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) संबंधी गुगलचं नवं धोरण आजपासून (11 मे) लागू झालं आहे. गुगलने (Google) आपल्या नव्या धोरणाविषयी मागील महिन्यात सांगितलं होतं की प्ले स्टोअरवरुन सर्व कॉल रेकॉर्डिंग अॅप्सवर बंदी घालण्यात येईल. त्यानुसार प्ले स्टोअर (Play Store) धोरणातील बदल आज म्हणजेच 11 मे पासून लागू झाले आहेत.


कॉल रेकॉर्डिंग करणारे सर्व अँड्रॉईड अॅपवर गुगलने बंदी घातली आहे. यामुळे थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅपद्वारे युझर्सचे कॉल रेकॉर्ड करता येणार नाहीत. मात्र ज्या फोनमध्ये इनबिल्ट रेकॉर्डिंग फीचर देण्यात आलं आहे त्या फोनवर या बंदीचा कोणताही प्रभाव दिसणार नाही.


गुगल कॉल रेकॉर्डिंग अॅप आणि सेवांच्या विरोधात आहे. हे युझर्सच्या गोपनीयतेसोबत छेडछाड असल्याचं कंपनीचं मत आहे. त्यामुळेच जेव्हा गुगलच्या डायलर अॅपवरुन कॉल रेकॉर्ड केला जातो तेव्हा दोन्ही बाजूंच्या वापरकर्त्यांना त्याची माहिती दिली जाते. ‘this call is now being recorded’ हा अलर्ट रेकॉर्डिंग सुरु होण्याआधी दोन्ही बाजूकडून युझर्सना स्पष्टरित्या ऐकू येते.


अँड्रॉईड 10 मध्ये गुगलने कॉल रेकॉर्डिंगला डिफॉल्ट स्वरुपातून ब्लॉक केलं आहे. यासाठी बंदीपासून वाचण्यासाठी प्ले स्टोअर अॅप्सनी कॉल रेकॉर्ड करण्यासाठी अॅक्सेसिबिलीटी एपीआयचा वापर करणं सुरु केलं. आजपासून गुगलने केलेल्या बदलांमुळे अॅक्सेसिबिलीटी एपीआयचा वापर आता करता येणार नाही.


या बदलामुळे केवळ थर्ड पार्टी अॅप्सवरुन कॉल रेकॉर्ड करणाऱ्या युझर्सवर परिणाम होईल, असं गुगलने स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्या फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर उपलब्ध असेल तर त्यात कोणताही बदल होणार नाही. उदाहरणार्थ Mi डायलर असलेल्या Google Pixels किंवा Xiaomi फोनमधील नेटिव कॉल रेकॉर्डिंग फंक्शनवर परिणाम होणार नाही.


जर तुम्हाला अँड्रॉईड स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्डर फीचरचा वापर करायचा असेल तर काही ब्रॅण्ड आहेत, ज्यांच्या डिव्हाईसमध्ये कॉल रेकॉर्डिंग हे फीचर इनबिल्ट आहे. यामध्ये Xiaomi/ Redmi/ Mi, Samsung, ओप्पो, पोको, वनप्लस, रियलमी, वीवो आणि टेक्नो यांचा समावेश आहे.


दरम्यान, एखाद्या देशात कॉल रेकॉर्डिंग कायदेशीर आहे की नाही यावर देखील रेकॉर्डिंग कार्यक्षमता अवलंबून असेल. भारतात सध्या कॉल रेकॉर्ड केले जाऊ शकतात. यामुळे, जर तुमच्या फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंगची सुविधा देण्यात आली असेल, तर तुम्ही पूर्वीप्रमाणेच कॉल रेकॉर्ड करु शकाल.