नवी दिल्ली : देशभरातील ग्रामीण भागातील जनतेला डिजिटल युगात आणण्यासाठी केंद्र सरकारने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेला रुरल ब्रॉडबँड प्रकल्प आता प्रत्यक्षात आणण्यासाठी दिशेने तयारी सुरु झाली आहे. बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीने देशातील एक लाख ग्राम पंचायती हाय-स्पीड इंटरनेटने जोडण्यासाठी वाय-फाय नेटवर्कची चाचपणी सुरु केली आहे.
"फायबर नेटवर्कसाठी प्रचंड अडथळ्यांना समोरं जावं लागतं. देशातील ग्रामपंचायतींना वाय-फाय नेटवर्कच्या मदतीने जोडण्यासाठी ब्रॉ़डबँड कनेक्टिव्हिटी द्यावी लागेल, त्यासाठी पायलट प्रोजेक्टवर काम सुरु करण्यात आलं आहे.", अशी माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील तीन गावांमध्ये या प्रकल्पाची चाचणी सुरु करण्यात आली आहे. बीएसएनएलने टेलिकॉम विभाग आणि यूएसओ यांच्याकडून आवश्यक निधीच्या मदतीची मागणीही केली आहे. टेलिकॉम विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्षरित्या काम सुरु करण्यात येणार आहे.
बीएसएनएलसाठी डोमेस्टिक टेलिकॉम इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनी विहान नेटवर्कने हा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. विहान नेटवर्कचे अध्यक्ष राजीव मेहरोत्रा यांनी याबाबत सांगितले, "या वाय-फाय टेक्नोलॉजीच्या माध्यमातून अशा गावांना ब्रॉडबँड सुविधा देणार, जिथे कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही."