रिओ दी जानेरो : ब्राझीलमध्ये न्यायाधीश मार्सेल मोंताल्वो यांनी व्हॉटसअॅप 72 तासांसाठी ब्लॉक केलं आहे. व्हॉटसअॅपची मालकी असलेल्या फेसबुकने एका गुन्हेगारी प्रकरणाशी संबंधित माहिती न्यायालयाला दिली नव्हती. त्यामुळे न्यायाधीशांनी थेट व्हॉटसअॅपव ब्लॉक केलं आहे.
72 तासांसाठी व्हॉटसअॅप ब्लॉक केल्याने ब्राझीलमधील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ब्राझीलमध्ये अशाच काही कारणांमुळे मागील वर्षी डिसेंबरमध्येही व्हॉटसअॅप काही काळासाठी बंद केलं होतं.
व्हॉटसअॅप ब्राझीलमध्ये लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. त्यामुळे व्हॉटसअॅप ब्लॉक झाल्यामुळे त्याचा फायदा टेलिग्राम या अॅपला मिळाला.
"72 तासांसाठी ब्लॉक करण्याच्या निर्णयामुळे निराशा झाली. आम्ही न्यायालयाला पूर्णत: सहकार्य केलं होतं," असा दावा व्हॉटसअॅपने केला आहे. "हा निर्णय म्हणजे ब्राझीलच्या दहा कोटींपेक्षा जास्त लोकांना शिक्षा केल्यासारखं आहे, जे आमच्या सेवेवर विश्वास ठेवतात," असंही व्हॉटसअॅपने म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वी आदेश न मानणाऱ्या एका फेसबुक एक्झिक्युटिव्हला अटक करण्याचा आदेश न्यायाधीश मार्सेल मोंताल्वो यांनी यंदाच्या मार्च महिन्यात दिला होता.