पॅरिस : पृथ्वीच्या वातावरणाशी साधर्म्य असलेल्या तीन ग्रहांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. 'नेचर' या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. हे ग्रह पृथ्वीपासून 40 प्रकाशवर्ष दूर आहेत.

 

अत्यंत थंड असलेल्या बटू ताऱ्याभोवती हे ग्रह परिभ्रमण करत आहेत. या ग्रहांचा आकार आणि तापमान काही प्रमाणात पृथ्वी तसंच शुक्रासारखंच असावं, असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला आहे. त्यामुळे या तिन्ही ग्रहांवर जीवसृष्टी असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

 

बेल्जियमचे खगोलभौतिक शास्त्रज्ञ मायकल गिलन आणि त्यांच्या टीमने हा ग्रहांचा शोध लावला आहे. आपल्या सौरमालेबाहेर जीवसृष्टी असू शकते आणि याचे रासायनिक पुरावे शोधण्याची ही पहिलीच संधी आहे, असं मायकल गिलन म्हणाले.

 

नव्याने सापडलेल्या या तिन्ही ग्रहांचा आकार पृथ्वीएवढंच असू शकतं. तसंच वातावरणही सारखं असावं, या शोधामुळे जीवसृष्टीबाबत सुरु असलेल्या प्रयत्नांना गती मिळण्याचा अंदाज आहे.