सावधान! डिलिट केल्यानंतरही व्हॉट्सअॅप चॅट डिलिट होत नाही
एबीपी माझा वेब टीम | 31 Jul 2016 03:53 PM (IST)
नवी दिल्ली : सोशल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हल्ली प्रत्येकाच्या स्मार्टफोन, आयफोनमध्ये असतं. किंबहुना, हल्ली फोनवरुन कमी आणि व्हॉट्सअॅपवरुनच अधिकाधिक संवाद साधला जातो. व्हॉट्सअॅपबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअॅप मेसेज डिलिट केल्यानंतरही व्हॉट्सअॅप किमान दोन महिन्यांपर्यंत तुमचे मेसेज सुरक्षित ठेवतं. आयओएस रिसर्चर जोनाथन डिजायरस्की यांच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप आपला डेटा सुरक्षित ठेवतं. मात्र, यूझर्सना यांचा थांगपत्ताही लागू देत नाही. जोनाथन यांनी अनेक स्टोरेज डिस्कच्या तपासानंतर सांगितले की, फॉरेन्सिक पद्धतीने व्हॉट्सअॅप संपूर्ण चॅटच्या अनेक कॉपी तयार करुन ठेवतं. मात्र, या कॉपी यूझर्सना दिसत नाहीत. एवढच नव्हे, तर या डेटामधून काही डेटा रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने रिकव्हरही केलं जाऊ शकतं. फोनमधील सर्व डेटा डिलिट केल्यानंतर अनेकदा व्हॉट्सअॅप मेसेजही डिलिट होतात. अशावेळीही काही अॅप्सच्या मदतीने डेटा रिकव्हर करता येतो. याच प्रकारे फेसबुक एंड टू एंड इनक्रिप्शनच्या माध्यमासाठी सिग्नल प्रोटोकॉल टूलचा वापर करतं. त्याचसोबत चॅटिंग आयक्लाऊडसारख्या स्टोरेजमध्ये ठेवण्यात येतं. हा डेटा कोर्टाच्या नोटीसनंतरच परत मिळवला जाऊ शकतो.