मुंबई : सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट 7 च्या बॅटरीचा स्फोट झाल्याचे वृत्त तुम्ही ऐकले असाल, मात्र, आता iPhone 7 चा स्फोट झाल्याचीही घटना घडली आहे.


ऑस्ट्रेलियातील सर्फर मॅट जोन्सच्या दाव्यानुसार, तो आपल्या कारमध्ये iPhone 7 ठेवून समुद्रात सर्फिंगसाठी गेला होता. परतल्यानंतर कारचा दरवाजा उघडल्यावर आतून धूर बाहेर आला. त्यावेळी त्याला काहीच कळलं नाही. मात्र, त्यानंतर फोन पाहिल्यावर लक्षात आलं की, फोन पूर्णपणे जळालेला होता.

जोन्सच्या माहितीनुसार, आयफोन दोन सीट्सच्या मधोमध ठेवला होता. फोन ज्या ठिकाणी कारमध्ये ठेवला होता, त्याठिकाणी स्फोट व्हावा अशाप्रकारची कोणतीही गोष्ट नव्हती. त्यामुळे आयफोन 7 चाच स्फोट झाल्याचं निश्चित आहे.

या आयफोनच्या स्फोटाची जे फोटो समोर आले आहेत, ते अत्यंत भयानक आहेत. आयफोनच्या स्फोटाची तीव्रता किती असेल, याचा अंदाज या फोटोंमधून समजू शकेल. स्फोटावेळी कारमध्ये कुणीच नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

गेल्या महिन्यात 7 सप्टेंबरला आयफोन 7 लॉन्च केला होता. त्यावेळी आयफोनच्या सुरक्षितेबाबत विश्वासही व्यक्त करण्यात आला होता. मात्र, लॉन्चिंगनंतर अवघ्या दोन महिन्यात घडलेल्या घटनेमुळे या आयफोनच्या सुरक्षिततेवर प्रश्न उभे केले जात आहेत. सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 नंतर आयफोन 7 मध्ये स्फोट झाल्याने यूझर्स चिंतेत आहेत.