नवी दिल्ली : गाड्यांच्या डिझेल इंजिनबाबत चुकीची माहिती दिल्याच्या आरोपानंतर फॉक्सव्हॅगन ग्रुपच्या ऑडी डिव्हिजनचे सीईओ रुपर्ट स्टँडलर यांना अटक करणयात आली आहे. ऑडीच्या प्रवक्त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


“स्टॅडलर यांना आज सकाळी अटक करण्यात आली असून, त्यांना ताब्यात ठेवायचे की नाही, यावर सुनावणी सुरु आहे.”, अशी माहिती ऑडीच्या प्रवक्त्यांनी दिली.

रुपर्ट स्टॅडलर आणि कंपनीच्या आणखी एका अधिकाऱ्यावर इमिशन टेस्टिंगमध्ये फसवणूक आणि खोट्या जाहिराती केल्याचा आरोप आहे.

सराकरी वकिलांच्या म्हणण्यानुसार, स्टॅडलर किंवा इतर आरोपी पुरावे नष्ट करु शकतात म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे.

रुपर्ट स्टॅडलर यांच्या अटकेनंतर ऑडीचे शेअर्स 2.6 टक्क्यांनी घसरले.

 रुपर्ट स्टॅडलर यांच्यावर नेमके कोणते आरोप आहेत?

रुपर्ट स्टॅडलर आणि सहआरोपींनी फसवणुकीसाठी बनावट कागदपत्र तयार केली, ज्यामुळे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असूनही गाड्या विक्री करण्यास परवानगी मिळाली. फॉक्सव्हॅगन, पोर्श आणि ऑडी यांसारख्या गाड्यांमध्ये इमिशन टेस्टिंग करणारं सॉफ्टवेअर आहे, मात्र या सॉफ्टवेअरमधून योग्य माहिती मिळत नाही.

बीबीसीच्या वृत्तानुसार, ऑडी A6 आणि A7 मॉडेलच्या 60 हजार गाड्यांमध्ये प्रदूषण स्तर लपवण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला गेल्याचं रुपर्ट स्टॅडलर यांनी मान्य केले.

ऑडी कंपनीने नेमकं असं का केलं?

अमेरिका आणि इतर काही देशांनी 2009 साली गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावरुन नियम अधिक कठोर केले होते. या नियमांना डावलल्यास कंपनीला दंड आकारला जातो. या दंडापासून वाचण्यासाठी ऑडी कंपनीने गाडीमध्ये अशा सॉफ्टवेअरचा वापर केला, ज्यामुळे प्रदूषणाच्या टेस्टिंगदरम्यान चुकीचे आकडे समोर येतात.

सप्टेंबर 2015 चं हे प्रकरण असून, या प्रकरणात 20 हून अधिक जण चौकशीच्या घेऱ्यात आहेत.