नवी दिल्ली : बँकांनी एटीएम मशिन्समध्ये कधी पैसे भरावेत, यासंबंधी केंद्र सरकार सुरक्षा मानकांची घोषणा करणार आहे. मानकं लागू झाल्यास रात्री आठ वाजल्यानंतर कोणत्याही बँकांना एटीएममध्ये पैसे भरता येणार नाहीत. ग्रामीण भागात 5 वाजेपर्यंत, तर नक्षलवादाने प्रभावित असलेल्या भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच पैसे भरता येणार आहेत.
एटीएम मशिन्सची सुरक्षा लक्षात घेऊन केंद्राने या कल्पनेवर विचार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हे प्रत्यक्षात आल्यास ग्राहकांना रात्री एटीएममधून पैसे मिळण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. कारण रात्री आठनंतर एटीएम मशिनमधील पैसे संपले असल्यास बँकांना त्यात पैसे भरता येणार नाहीत.
याचसोबत केंद्र सरकार कॅश व्हॅनबाबतही विशिष्ट अटी घालण्याच्या विचारात आहे. सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा असलेली, खास डिझाईन केलेली व्हॅन कॅश डिलिव्हरीसाठी वापरणं बंधनकारक करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे.
शिवाय, या व्हॅनसोबत दोन सशस्त्र सुरक्षारक्षक आणि ड्रायव्हर असावा. कॅश व्हॅनमध्ये असणाऱ्या दोन सशस्त्र सुरक्षारक्षक आणि ड्रायव्हरला दोन जामीनमदारांची नावंही सूचवावी लागणार आहेत. विशेष म्हणजे यातील एक जण सरकारी नोकरदार असण्याचीही अट ठेवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचसोबत कॅश व्हॅनमधून किती रोख रक्कम न्यावी, याबाबतही मर्यादा ठरवली जाण्याची शक्यता आहे.