नवी दिल्ली : असुसने फ्लिपकार्टसोबत भागीदारी केल्यानंतर आपला पहिलाच फोन जेनफोन मॅक्स प्रो M1 भारतात लाँच केला आहे. 18:9 ऑस्पेक्ट रेशोची फुल एचडी स्क्रीन असणारा हा फोन थेट शाओमीच्या रेडमी नोट 5 प्रोला टक्कर देण्याची शक्यता आहे. भारतासह जगभरात हा फोन लाँच करण्यात आला. फ्लिपकार्टवर 3 मेपासून या फोनची विक्री सुरु होईल.

जेनफोन मॅक्स प्रो M1 ची किंमत आणि ऑफर

असुस मॅक्स प्रो M1 ची किंमत भारतात 10 हजार 999 रुपयांपासून सुरु होणार आहे. सोबतच 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जनची किंमत 10 हजार 999 रुपये असेल, तर 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जनची किंमत 12 हजार 999 रुपये असेल. कंपनीने फ्लिपकार्टसोबत मोबाईल प्रोटेक्शनसाठी भागीदारी केली आहे. त्यामुळे 49 रुपयात या फोनचं डॅमेज रिपेअर करुन दिलं जाईल.

लाँच ऑफर अंतर्गत, हा फोन खरेदी करणाऱ्या व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांनी 199 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा प्लॅन घेतल्यास बारा महिन्यांसाठी 10GB डेटा दिला जाईल. तर पोस्टपेड ग्राहकांना 399 रुपयांच्या रेड प्लॅनवर बारा महिन्यांसाठी 10GB डेटा मिळेल.

जेनफोन मॅक्स प्रो M1 चे स्पेसिफिकेशन

मॅक्स प्रो M1 ड्युअल सिम सपोर्टिव्ह आहे, जो अँड्रॉईड 8.1 ओएस सिस्टमवर चालतो. अँड्रॉईड P आणि Q चे अपडेट या फोनला मिळतील. 5.99 इंच आकाराची स्क्रीन आणि स्नॅपड्रॅगन 636 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

याशिवाय मॅक्स प्रो M1 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सेल आणि सेकंडरी लेन्स 5 मेगापिक्सेलची आहे, तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. रिअर आणि फ्रंट अशा दोन्ही कॅमेऱ्यांसाठी फ्लॅश आहे. इंटर्नल स्टोरेज 2TB पर्यंत वाढवलं जाऊ शकतं. या फोनची बॅटरी हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. 5000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे.

दरम्यान, कंपनीने यासोबतच 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जनचीही घोषणा केली आहे. यामध्ये 16MP+5MP कॉम्बिनेशनचा रिअर कॅमेरा असेल. लवकरच हे व्हेरिएंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल, ज्याची किंमत 14 हजार 999 रुपयांपासून असेल.