नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे आज (सोमवार) गुगलचं ‘तेज’ हे यूपीआय बेस्ड डिजिटल पेमेंट अॅप लाँच करणार आहेत. या अॅपमुळे डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे.


'अर्थमंत्री अरुण जेटली सोमवारी (18 सप्टेंबर) गुगल डिजिटल अॅप लाँच करतील.' असं ट्वीटही अर्थ मंत्रालयानं केलं आहे.

गुगल इंडियानं आज नवी दिल्लीत मीडियाला एका इव्हेंटचं आमंत्रण दिलं आहे.

'आमचं प्रोडक्ट यूजर्सच्या गरजा पूर्ण करतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रोडक्ट लाँचिंगवेळी आम्ही याबाबत संपूर्ण माहिती देऊ. यासाठी तुम्हाला हे निमंत्रण देण्यात येत आहे. 'तेज' अॅप अँड्रॉईड पे सारखं काम करेल.' असं या निमंत्रणात म्हटलं आहे.

यूपीआय भारतीय राष्ट्रीय देयक निगमकडून लाँच करण्यात आलेली देयक प्रणाली आहे. ही प्रणाली भारतीय रिझर्व्ह बँक नियंत्रित करते. यूपीआयच्या मदतीनं मोबाइलमधून दोन बँक खात्यांच्यामध्ये तात्काळ पैसे ट्रान्सफर करता येऊ शकतात.

डिजिटल पेमेंट प्रणाली भारतात वाढत असून आता व्हॉट्सअॅप देखील त्यासाठी प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, व्हॉट्सअपची पहिल्यापासून एनपीसीआयसोबत बोलणी सुरु आहे.

डब्ल्यूएबेटाइंफो ब्लॉग वेबसाइटच्या वृत्तानुसार, 'व्हॉट्सअॅप यूपीआय प्रणालीचा वापर करुन बँक टू बँक ट्रान्सफर योजनेला अंतिम स्वरुप देत आहे.’