मुंबई: एक नवं मोबाइल अॅप 'नानू' हे आता मोबाइल आणि लॅण्डलाईन नंबरवर मोफत कॉलची सेवा देत आहे. मात्र, या अॅपला दूरसंचार कंपन्यांनी आक्षेप घेतला असून ट्राय आणि सरकारकडे याबाबत तक्रार केली आहे.


नानूचे प्रमुख मार्टिन नॅगेटने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'आपण भारताचा दूरसंचार कायदा पाहिल्यास त्यामध्ये इंटरनेटवरुन कोणताही डेटा ट्रान्समिशन करु शकता. त्यामुळे हे पूर्णत: वैध आहे. कारण की, दूरसंचार परवान्यामध्ये याबाबत कोणताही नियम नाही. जर तुम्ही हा संदर्भ पाहिल्यास तुम्हाला दिसून येईल की, हे क्षेत्र अस्पष्ट आहे.'

हे अॅप वापरणाऱ्यांना नानू दररोज एका मर्यादेपर्यंत मोफत कॉलची सुविधा देतं. ही सेवा मोबाइल आणि लॅण्डलाईन दोन्ही क्रमांकावर उपलब्ध आहे. या सुविधेचा फायदा असेही लोक घेऊ शकतात ज्यांनी हे अॅप इंस्टॉल केलेलं नाही.

ट्रायने नेट न्यूट्रेलिटीच्या मुद्द्यावर सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये मोबाइल अॅप्लिकेशनवरुन कॉल करण्याच्या सुविधेवर देखील चर्चा झाली आहे.

दरम्यान मे महिन्यात दूरसंचार कंपन्यांची संस्था सीओएआयनं दूरसंचार विभागाकडे याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच अॅपच्या माध्यमातून कॉल करण्यावर बंधन आणावं अशीही मागणी त्यांनी केली आहे. कारण की हे नियमाच्या विरुद्ध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.