कॅलिफोर्निया : जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी अॅपलने आपल्या नव्या इव्हेंटच्या तारखेची घोषणा केली आहे. 7 सप्टेंबर रोजी 'अॅपल'चा यावर्षातील दुसरा इव्हेंट होणार आहे. याच इव्हेंटमध्ये अॅपल कंपनी आपला बहुप्रतीक्षित 'आयफोन 7' किंवा 'आयफोन 6SE' आणि अॅपल वॉच लॉन्च करण्याची शक्यता आहे. अॅपल कंपनीने प्रेस इन्व्हाईटला 'See you on the 7th' असा मथळा दिला आहे.
अॅपलचा नवा आयफोन हा आधीच्या सर्व आयफोनपेक्षा अधिक स्लिम असेल आणि अन्य फीचर्समध्येही थोडेफार बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. नव्या आयफोनमध्ये एक मोठा बदल म्हणजे 3.5mm ऑडिओ जॅक नसेल. शिवाय, वॉटर रेसिस्टंट फीचरमध्येही काही बदल करुन अधिक सुरक्षित बनवल्याचं बोललं जात आहे.
आयफोन डिव्हाईस नेहमीच आपल्या चांगल्या कॅमेऱ्यासाठी ओळखले जातात. हेच लक्षात घेऊन अॅपल कंपनी आयफोन 7 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देऊ शकते. यावेळी कंपनी आपल्या बेस मॉडेल असलेल्या 16 जीबीमध्ये बदल करुन 32 जीबी करेल. म्हणजेच आयफोन 7 कमीत कमी 32 जीबी व्हेरिएंट असेल.
लीक रिपोर्ट्समध्ये काय दावा करण्यात आला आहे?
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये 3 जीबी रॅम असेल. यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप, वॉटरप्रूफ, वायरलेस चार्जिंगची सुविधा इत्यादी फीचर्स असतील. शिवाय, फोर्स टच होम बटन आणि नवी एंटिना लाईन्ससारखे बदलही यात केले जाणार आहेत. त्याचसोबत अॅपल यावेळी आयफोनला A10 चिप आणि 32 जीबी, 128 जीबी, 256 जीबी स्टोरेजचे मॉडेल्सही बाजारात आणणार आहे. विविध मीडिया रिपोर्ट्समधून लीक झालेल्या माहितीनुसार, आयफोन 7 मध्ये 12 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेराही असण्याची शक्यता आहे.