मुंबई : अॅपल लवकरच नवा आयफोन लाँच करणार आहे. कॅलिफोर्नियातील क्यूपरटीनोमध्ये 12 सप्टेंबर रोजी अॅपल पार्कमध्ये स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये अॅपलचे नवे आयफोन लाँच होतील.


फोनशिवाय आणखी काही गॅजेटही लाँच केले जाणार आहेत. या इव्हेंटमध्ये अॅपल वॉच 4, अॅपल एअर पॉवर आणि पॉड 2 यांचा समावेश आहे. कंपनीचे सीईओ टीम कुक यांच्या हस्ते लाँचिंग होण्याची शक्यता आहे.

तीन नवीन मोबाईल फोन

अॅपल यावेळी तीन आयफोन लाँच करणार आहे. 6.5 इंच, 5.8 इंच आणि 6.1 इंच या आकाराची स्क्रीन असणाऱ्या या आयफोन्सचे फीचर्सही दमदार असतील. शिवाय 6.5 इंच आकाराची स्क्रीन असणाऱ्या आयफोनची किंमत अमेरिकेत एक हजार डॉलर म्हणजेच भारतात जवळपास 90 हजार रुपये असेल, असंही बोललं जात आहे.

अॅपल स्मार्टवॉच

अॅपल स्मार्टवॉच 4 12 सप्टेंबरला लाँच होण्याची शक्यता आहे. दमदार बॅटरी बॅकअप आणि चांगल्या परफॉर्मन्ससह ही स्मार्टवॉच दोन साईजमध्ये असेल. एक 38 एमएम आणि दुसरी 42 एमएम अशी साईज असण्याचा अंदाज आहे. यामध्ये चार चिपसेट असतील. कनेक्टिव्हिटीसाठी एलटीई आणि वायफाय सुविधा दिली जाण्याची शक्यता आहे.

अॅपल एअरपॉवर

या डिव्हाईसचा लूक गेल्यावर्षी लाँच करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी हे नवं डिव्हाईस लाँच केलं जाण्याची अपेक्षा आहे.

अॅपल पॉड 2

अॅपल पॉड 2 चे वायरलेस इयरफोन लाँच होण्याची शक्यता आहे. हे डिव्हाईस वॉटर रेजिस्टेंट असेल. याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा आहेत.