Apple to appeal Brazil sales ban of iPhone without charger : ब्राझीलमध्ये चार्जरशिवाय आयफोन विकण्यास ॲपल कंपनीला बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नाही, चार्जरशिवाय आयफोन विकल्यामुळे ॲपल कंपनीला तब्बल 20 कोटींच्या जवळपास दंड ठोठावण्यात आला आहे. अॅपल कंपनीने ग्राहकांना अपूर्ण उत्पादन पुरवल्याचा दावा ब्राझील सरकारनं केला आहे. मंगळवारी यासंदर्भात ब्राझील सरकारकडून अधिकृत परिपत्रक काढत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ब्राझील सरकारनं दिलेल्या या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचं ॲपल कंपनीनं सांगितलं आहे. 


अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित असलेल्या ॲपल कंपनीला ब्राझील सरकारच्या न्याय आणि सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने 12.28 दशलक्ष रियास दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ब्राझील सरकार आणि ॲपल कंपनीमध्ये द्वंद्वयुद्ध सुरु झाले आहे. दरम्यान, ॲपलचा नवा आयफोन बाजारात येण्याच्या आधीच हा मोठा दंड ठोठावल्यानं कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्राझीलमध्ये आयफोन 12 आणि 13 च्या सोबतच पुढील सर्व मॉडल्सच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. 


कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशानं आम्ही चार्जरशिवाय आयफोन आपण यापुढे विकणार असल्याचा युक्तिवाद आयफोन 12च्या लॉन्चवेळी कंपनीकडून करण्यात आला होता. तोच युक्तीवाद कंपनीनं यावेळी देखील ब्राझीलमध्ये केला. मात्र, अधिकाऱ्यांनी हा युक्तीवाद नाकारत पर्यावरणाचे संरक्षण होते, याचा कोणताही पुरावा नसल्याचं म्हंटलं आहे. सोबतच अॅपल कंपनीने केलेली ही कृती ग्राहकांविरुद्ध जाणूनबुजून भेदभाव करणारी असल्याचं म्हटलं आहे. 


दरम्यान, अॅपल कंपनीनं यावर भाष्य करताना म्हटलंय की आम्ही या प्रकरणावर ब्राझीलमध्ये अनेक न्यायालयीन निर्णय जिंकले आहेत. सोबतच याप्रकरणी आम्ही दाद देखील मागणार आहोत. दुसरीकडे, आमच्या ग्राहकांना त्यांचे आयफोन चार्ज करण्यासाठी विविध पर्यायांची माहिती आहे. त्यामुळे ब्राझील सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आज ॲपलचा नवा आयफोन लॉन्च होणार आहे. त्याआधी ॲपलला हा मोठा धक्का मानला जात आहे. 






वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Amazon Deal : 'या' खास फिचरमुळे अॅपल वॉच आहे अतिशय खास; जाणून घ्या वैशिष्ट्य


Apple Event 2022 Date, Time and LIVE Streaming : प्रतीक्षा संपली! iPhone 14 आज होणार लाँच; कुठे आणि किती वाजता पाहता येणार अॅपलचा ग्रँड इव्हेंट, जाणून घ्या...