सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अॅपलच्या स्वयंचलित कारचा चाचणीवेळी अपघात झाला. दुर्घटनाग्रस्त कारचं नुकसान झालं आहे. 'द वर्ज'च्या वृत्तानुसार, कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ मोटर व्हेहिकलमध्ये अॅपलकडून करण्यात आलेल्या नोंदीनुसार, स्वयंचलित कार एक आठवड्यापूर्वी सन्नीवेलमध्ये दुर्घटनाग्रस्त झाली.

दरम्यान, या घटनेत स्वयंचलित कारची चूक नसल्याचं बोललं जात आहे. कारण, त्यावेळी सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करत होतं. अॅपलकडून कॅलिफोर्नियात अनेक लेक्सस एसयूव्हीची चाचणी केली जात आहे. दुर्घटना झाली तेव्हा कार ऑटोनोमस मोडमध्ये होती. या कारला पाठीमागून निस्सान कारने टक्कर दिली.

वृत्तानुसार, दुर्घटनेतील दोन्हीही कारचं नुकसान झालं. मात्र दोन्हीही कारमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. अशा प्रकारच्या कारमुळे आतापर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत.

18 मार्च रोजी एरिजोनामध्ये एका महिलेसोबत उबेरच्या स्वयंचलित कारचा अपघात झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनीच टेस्ला मॉडेल एक्स वाहनाच्या मालकाचा कॅलिफोर्नियात मृत्यू झाला, जेव्हा वाहनाने हायवेच्या बॅरियरला टक्कर दिली आणि वाहनाला यानंतर आग लागली.