मुंबई : अॅपलकडून भारतात आयफोन 5s या फोनच्या किंमतीत लवकरच मोठी कपात केली जाणार असल्याची माहिती आहे. चार वर्षांपूर्वी लाँच झालेल्या या फोनची किंमत भारतीय बाजारात 15 हजार रुपये केली जाऊ शकते.

'इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार अॅपलकडून यासोबतच आयफोन SE च्या किंमतीतही कपात केली जाऊ शकते. 5s ची किंमत 15 हजार रुपये असेल, कंपनीच्या ऑनलाईन मार्केटिंगचा हा भाग आहे. अॅपलची भारतात मिड-बजेट स्मार्टफोनवर नजर असेल, ज्यावर सध्या चिनी कंपन्यांचं वर्चस्व आहे, असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

अॅपलच्या सर्व विक्रेत्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. ही ऑफर केवळ ऑनलाईन फोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी असेल. 5s फोनची सध्याची किंमत 20 हजार रुपये आहे, तो 15 हजार रुपयात मिळेल, असं कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

अॅपलच्या या नव्या धोरणासोबतच 5s ची टक्कर ऑनलाईन विकल्या जाणाऱ्या मोटोरोला, शाओमी, लेनोव्हो, ओप्पो आणि सॅमसंग या ब्रँड्सच्या स्मार्टफोनसोबत होणार आहे.

भारतात एकूण विकल्या जाणाऱ्या आयफोनमध्ये 20 टक्के हिस्सा 5s चा आहे. 15 ते 20 हजार रुपयांदरम्यान किंमत असणारे स्मार्टफोन जानेवारी ते मार्च या तिमाहित 158 टक्क्यांनी वाढले आहेत. यामध्ये सॅमसंग, ओप्पो, व्हिव्हो, जिओनी, शाओमी, मोटोरोला यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

भारतात अॅपल प्रिमियम सेंगमेंट स्मार्टफोनमध्ये आहे. या सेंगमेंटच्या स्मार्टफोनमध्ये केवळ 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी मिड-बजेट स्मार्टफोनच्या तुलनेत अतिशय कमी आहे. त्यामुळे आता अॅपलने भारतात मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये उडी घेतली आहे.