मुंबई: भारतातील सर्वात मोठी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी भारती एअरटेलनं स्पष्ट केलं आहे की, जिओ बाजारात आल्यानं कॉल दरांमध्ये स्पर्धा नक्कीच वाढली आहे. त्यामुळे व्हॉईस कॉलच्या दरांमध्ये घट झाली आहे. पण एअरटेल व्हॉईस कॉल जिओसारखं पूर्णपणे मोफत देणार नाही.


भारती एअरटेलचे एमडी आणि सीईओ (भारत-दक्षिण आशिया) गोपाल विट्टल यांच्या मते, 'टेलीकॉम सेक्टरमधील स्पर्धा चांगलीच वाढली आहे. आम्ही या आव्हानाचा नक्कीच सामना करु. पण इतरांमुळे आम्ही अजिबात प्रभावित होणार नाही. नव्या कंपन्या आल्यामुळे दरांमध्ये नक्कीच कपात झाली आहे.'

पाच सप्टेंबरला जिओ लाँच करताना कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हॉईस कॉल आणि डेटा वेलकम ऑफरमध्ये पूर्णपणे मोफत असल्याची घोषणा केली होती. वेलकम ऑफरमध्ये कंपनी ३१ डिसेंबरपर्यंत कोणताही कॉल अथवा डेटा चार्ज करणार नाही. तसंच जिओ आपल्या ग्राहकांना नेहमीसाठी फ्री व्हॉईस कॉल देणार आहे.

जिओची ही ऑफर इतर टेलिकॉम कंपन्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरली आहे. जिओच्या लाँचिंगपासून अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या डेटा आणि कॉल दरांमध्ये बरीच कपात केली आहे.

नुकतंच एअरटेलनं नोकियासोबत VoLTE साठी करार केला आहे. याची किंमत 402 कोटी एवढी आहे.

संबंधित बातम्या:
3 डिसेंबरपर्यंत जिओचं सिम घेणाऱ्यांनाच फ्री कॉलिंग ऑफर!

जिओ म्हणजे व्यावसायिक निर्णय, जुगार नाही : मुकेश अंबानी