नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल आज व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन (VoLTE) सेवा लाँच करण्याची शक्यता आहे. एअरटेलच्या VoLTE सेवेची घोषणा आज होणाऱ्या कंपनीच्या कार्यक्रमात केली जाईल, अशी माहिती आहे.
एअरटेलकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अॅपल इंडियाच्या सपोर्ट पेजला VoLTE सर्व्हिसबाबत माहिती असल्याचा दावा करण्याता आला आहे. त्यामुळे एअरटेलची VoLTE सेवा आज लाँच केली जाईल, असा अंदाज लावण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एअरटेलची VoLTE सेवा लाँच केली जाईल, असं बोललं जात होतं. मुंबई आणि दिल्ली यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये या सेवेची चाचणीही करण्यात आली आहे.
भारतात VoLTE सेवा देणारी रिलायन्स जिओ एकमेव कंपनी आहे. जिओचे देशभरात 12 कोटी ग्राहक आहेत. जिओने कंपन्यांसमोर तगडं आव्हान उभं केल्यानंतर ग्राहकांना VoLTE सेवा देण्यासाठी इतर कंपन्यांही सरसावल्या आहेत.
काय आहे VoLTE सेवा?
VoLTE ही अशी सुविधा आहे, ज्यामुळे डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करता येते. म्हणजेच तुमच्या डेटा पॅकमध्येच तुम्ही कॉलिंगचाही लाभ घेऊ शकता. VoLTE सेवेत ग्राहकांना व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळते.
एअरटेलने VoLTE सेवा सुरु केल्यानंतर ही सेवा देणारी एअरटेल जिओनंतर दुसरी कंपनी ठरेल. तर व्होडाफोनही लवकरच VoLTE सेवा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.