सॅन फ्रान्सिस्को : खास अपडेट देताना गुगलने मोबाईल सर्च रिझल्टमध्ये 6 सेकंदांचा प्रीव्ह्यू व्हिडिओ जोडला आहे. व्हिडिओतील कोणता 6 सेकंदांचा भाग युझर्सना दाखवायचा याचं विश्लेषण गुगल आता लर्निंग क्षमता या मशीनचा वापर करुन करणार आहे.
अपडेटनंतर हा व्हिडिओ अँड्रॉईड गुगल अॅप किंवा गुगल क्रोममध्ये प्ले होईल. सर्चमध्ये वेबवर असलेला कोणताही व्हिडिओ प्रीव्ह्यू म्हणून दाखवला जाईल, असं गुगलच्या या प्रोडक्टच्या संचालक अॅमिली मोक्सले यांनी 'टेकक्रंच'शी बोलताना म्हटलं आहे.
प्रीव्ह्यू व्हिडिओमध्ये वेबवरील कोणताही व्हिडिओ दाखवला जाईल. मात्र काही नवीन व्हिडिओ दाखवले जाणार नाहीत. कारण नवीन प्रीव्ह्यू तयार करण्यासाठी गुगल सर्व्हरला वेळ लागतो, असंही अॅमिली मोक्सले यांनी सांगितलं.
मोबाईल केवळ वायफायशी जोडलेला असेल, तरच हा व्हिडिओ प्ले होईल. शिवाय एखाद्या युझरला हा व्हिडिओ पाहायचा नसेल, तर सेटिंग बदलण्याचाही पर्याय देण्यात येणार आहे.