मुंबई : रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त फीचर फोन देण्याची घोषणा केल्यानंतर ग्राहकांना या फोनची उत्सुकता लागली आहे. 15 ऑगस्ट रोजी बीटा टेस्टिंगसाठी हा फोन कंपनीने लाँच केला. ग्राहकांच्या हातात हा फोन सप्टेंबर महिन्यात पडणार आहे. 24 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.


153 रुपयात एका महिन्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा मिळणार असल्याने या फोनवर ग्राहकांची उडी पडणार आहे. फोन मोफत मिळणार असला तरी तीन वर्षांसाठी 1500 रुपये भरावे लागणार आहेत. जे तीन वर्षांनी परत मिळतील.

जो अगोदर बुक करेल, त्यालाच अगोदर हा फोन मिळणार आहे. त्यामुळे आतापासूनच फोन बुक करण्यासाठी ग्राहकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये या फोनची प्री बुकिंगही सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे फोनच्या बुकिंगसाठी ग्राहकांनी राजधानी दिल्लीतल्या दुकानांमध्ये गर्दी केली आहे.

एका मेसेजवर फोन बुक करा!

दुकानांमध्ये रांगते उभं रहायचं नसेल तर तुम्ही घरबसल्याही जिओ फोन बुक करु शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एक मेसेज करावा लागेल.

  • जिओ फोन बुक करण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये जाऊन ‘JP> तुमचा पिनकोड> जवळच्या जिओ स्टोअरचा कोड’ 7021170211 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

  • मेसेज पाठवताच तुम्हाला Thank You असा रिप्लाय येईल.

  • ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार ग्राहकाचा हा मेसेज कंपनीला मिळताच फोनविषयी संपूर्ण माहिती कॉल करुन ग्राहकाला दिली जाईल.

  • 24 ऑगस्ट रोजी जिओ फोनची अधिकृत बुकिंग सुरु होणार आहे. तेव्हापासूनच ग्राहकांना फोन करुन त्यांच्या फोनविषयी माहिती दिली जाईल.

  • ज्या ग्राहकाला जिओ फोन खरेदी करायचा आहे, त्याला कंपनीकडून अशा जिओ स्टोअरचा कोड दिला जाईल, जिथे जिओ फोन उपलब्ध असेल.

  • जिओ फोन बुक करण्यासाठी ग्राहकाकडे आधार कार्ड असणं बंधनकारक आहे.

  • आधार कार्डची फोटो कॉपी जवळच्या अधिकृत जिओ फोन विक्रेत्याला द्यावी लागेल. एका आधार कार्डवर केवळ एकच फोन खरेदी करता येईल.

  • आत्ता जिओ फोन बुक करणाऱ्या ग्राहकांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात फोन मिळण्याची शक्यता आहे. बुकिंगच्या आधारावर या फोनचे युनिट बाजारात येतील, असा अंदाज लावला जात आहे.


ऑनलाईन बुकिंग कशी कराल?

ज्यांना दुकानामध्ये जाऊन रांगेत उभं रहायचं नाही, त्यांना हा फोन ऑनलाईन बुक करता येईल. माय जिओ अॅप किंवा जिओच्या वेबसाईटवर हा फोन बुक करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.

ऑफलाईन बुकिंग कशी कराल?

ज्या ग्राहकांना ऑनलाईन किंवा मेसेजवर फोन बुक करण्याची प्रक्रिया माहित नसेल, ते 24 ऑगस्टपासून जवळच्या रिलायन्स जिओ स्टोअरमध्ये जाऊन फोन बुक करु शकतात. जिओ स्टोअरची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर किंवा अपवर मिळेल.

जिओ फोनचा नेमका फायदा काय?

जिओ फोनचा फायदा डेटा वापरणाऱ्यांसोबत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण ग्रामीण भागात फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिवाय इतर दूरसंचार कंपन्यांचे व्हॉईस कॉल दर सर्वच ग्राहकांना परवडणारे नाहीत. मात्र जिओच्या 153 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात येणार आहे, हा त्याचा सर्वात मोठा फायदा असेल. तुम्ही सतत इंटरनेट वापरत नसाल, तरीही तुम्हाला मोफत व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेता येईल.

जिओ फोनसाठी फक्त आधार कार्डची गरज

जिओ फोनची बुकिंग करताना तुम्हाला अधिकृत जिओ फोन विक्रेत्याकडे आधार कार्डची एक झेरॉक्स द्यावी लागेल. एक व्यक्ती एका आधार कार्डवर देशात एकच फोन खरेदी करु शकतो. त्यामुळे तुम्हाला अनेक फोन बुक करण्याची इच्छा असेल तर तसं करता येणार नाही. आधार कार्ड दिल्यानंतर नोंदणी होईल, त्यानंतर टोकण नंबर देण्यात येईल. हा टोकण नंबर फोन घेताना उपयोगी येईल.

जिओ फोनसाठी किती पैसे लागणार?

जिओ फोन हा शून्य रुपये किंमतीमध्ये असेल, मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागतील, अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली होती. मात्र ऑफलाईन फोन खरेदी करताना तुम्हाला आधार नंबर व्यतिरिक्त कशाचीही गरज नाही. फोन हातात पडेल तेव्हा 1500 रुपये द्यावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.

संबंधित बातम्या :

जिओ फोनसाठी नोंदणी सुरु, मोफत फोन मिळवण्यासाठी काय कराल?

जिओ फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट नसणार!

खुशखबर! जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅपचं स्पेशल व्हर्जन चालणार?

‘डेटागिरी’नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस

भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!

रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन