हॅकर्सला लगाम घालण्यासाठी ट्विटरचं एक जबरदस्त फीचर
एबीपी माझा वेब टीम | 09 Mar 2017 04:36 PM (IST)
मुंबई: ट्विटरचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, बऱ्याचदा काही जणांचे अकाउंट हॅक होण्याचा घटना समोर येत आहे. या सर्वाचा विचार करुन ट्विटरनं आता यूजर्ससाठी एक नवं फीचर आणलं आहे. आजवर फक्त पासवर्ड हे एकमेव फीचर होतं की, ज्यामुळे तुमचं ट्विटर अकाउंट हे सुरक्षित राहत होतं. मात्र, बऱ्याचदा हॅकर्स तुमचा पासवर्ड हॅक करतात. यावरच ट्विटरनं आता नवा उपाय शोधला आहे. जर तुमच्याकडे आयओएस किंवा अँड्रॉईड डिव्हाईस असेल तर त्याच्याशी संबंधित ट्विटर अॅपचं अॅप डाऊनलोड करुन घ्यावं लागेल. सर्वात आधी तुम्हाला ट्विटरच्या अकाउंटवर जाऊन सेटिंगमधील सिक्युरिटीतील लॉग इन व्हेरिफिकेशनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तिथं तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर सहा अंकी कोड येईल. तो टाकल्यानंतर तुमचं ट्विटर अकाउंट सुरु होईल. त्यामुळे यापुढे तुम्हाला तुमचं ट्विटर अकाउंट सुरु करताना पासवर्ड आणि तुमच्या मोबाइलवर येणारा सहा अंकी कोड टाकावा लागेल.