मुंबई : रिलायन्स जिओने एक अनोखा विक्रम केला आहे. जिओने आतापर्यंत 10 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी कंपनीचे चेअरमन आणि व्यस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी याबाबत माहिती दिली.
“जिओच्या सुरुवातीलाच आम्ही 10 कोटी ग्राहकांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, एवढ्या कमी वेळात लक्ष्य पार करु याची कल्पनाही केली नव्हती. आधार कार्डमुळे आम्ही दिवसाला जवळपास 10 लाख ग्राहकांना जोडू शकलो. विशेष म्हणजे असा विक्रम यापूर्वी टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये कधीही झालेला नाही”, असे मुकेश अंबानी म्हणाले.
मुकेश अंबानींनी नॅसकॉम इंडिया लिडरशिप फोरम 2017 मधील एका सेशनमध्ये याबाबत माहिती दिली.
“जिओची सुरुवातच अशा वेळेस झाली की, जग वेगाने डिजिटाईज होत होतं. उद्योगक्षेत्राला अधिक प्रॉडक्टिव्ह बनवण्यासाठी आणि वेगवेगळ्या अडचणींना सोडवण्यासाठी जिओचं प्लॅटफॉर्म मदत करतं”, असेही ते म्हणाले.
रिलायन्स जिओने वेलकम ऑफरमध्ये मोफत व्हॉईस कॉल, डेटा देऊन टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवली. अनेक ग्राहक जिओकडे वळले. त्यामुळे भारतातील इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो आहे. डिसेंबरनंतर जिओने मार्च 2017 पर्यंत वेलकम ऑफरची मुदत वाढवली. त्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे आणखी धाबे दणाणले आहे.