5G Internet Service : आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा (5G Internet Service) सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022)5जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात आली. यामुळे आता भारतातही इंटरनेट सुस्साट होणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन आयडिया (Vodafone-idea) या कंपन्या स्पर्धेत आहेत. आता कोणती कंपनी 5G इंटरनेटची सुरुवात करतेय, हे पाहावं लागेल.


5G इंटरनेट सेवा सुरु होणार या पार्श्वभूमीवर अनेक मोबाईल कंपन्यांनी आधापासून 5जी मोबाईलवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली होती. सध्या बाजारात अनेक 5G मोबाईल उपलब्ध आहेत. तर काही कंपन्या सर्वात स्वस्त 5G मोबाईल देत आहेत. रिलायन्स जियो कंपनीने नुकताच जिओ 5G फोन (Jio 5G Phone) लाँच केला आहे. 


5G बाबत सर्वसामान्यांना अनेक प्रश्न आहेत. 5G इंटरनेट कसं असेल? 5G नेटवर्क, सिम कार्ड, स्पीड आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.


काय आहे 5G नेटवर्क?


5G इंटरनेट सेवा म्हणजे Fifth Generation अर्थात पाचवी पिढी असा आहे. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशनची पाचवी पिढी म्हणून ओळखली जाते. 5G नेटवर्क 2G , 3G , 4G नेटवर्कपेक्षा अधिक वेगवान असेल. 5G नेटवर्क 4G पेक्षा कमीतकमी 10 पटीने वेगानं इंटरनेट स्पीड देईल. 


असं असेल 5G सिम कार्ड


सध्या बाजारात 2G ते 4G पर्यंत सिम कार्ड उपलब्ध आहे. काही कंपन्यांच्या मते, 4G सिम कार्डमधेच 5G इंटरनेट सेवा वापरता येईल. तुम्ही तुमचं 4G सिम कार्ड 5G मध्ये अपग्रेड करु शकता. यामुळे 4G वरून 5G सेवा अपग्रेड केल्यानंतर सिम कार्ड ग्राहकांना बदलावं लागणार नाही. ग्राहकांना त्यांच्या टेलिकॉम ऑपरेटरना कळवून त्यांचं 4G कनेक्शन थेट 5G मध्ये रूपांतरित करता येईल.


5G इंटरनेटसाठी 5G मोबाईल आवश्यक


तुम्हाला 5G इंटरनेट सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 5G मोबाईल असणं गरजेचं आहे. 4G स्मार्टफोनमध्ये 5G सेवा चालवता येईल, असं म्हटलं जात होतं. मात्र 5G सेवा फक्त 5G स्मार्टफोनमध्येच चालेल आणि यासाठी तुम्हाला नवीन 5G स्मार्टफोन घ्यावा लागेल. उदाहरणार्थ, 2G फोनमध्ये 4G सिम इन्स्टॉल करता येते, पण त्यावर फक्त 2G सेवा उपलब्ध असते. तसेच जर तुम्ही 2G किंवा 3G फोनमध्ये Jio सिम कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला तर ते चालत नाही. याचं कारण म्हणजे Airtel, Vodafone Idea सिमकार्डमध्ये 4G सोबत 2G आणि 3G सेवा आहे. तर Jio कडे फक्त 4G नेटवर्क उपलब्ध आहे. त्यामुळे जिओ सिम कार्ड 2G किंवा 3G फोनमध्ये सपोर्ट करत नाही. त्यामुळे तुम्हाला 4G स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क वापरता येणार नाही, 4G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फक्त 4G नेटवर्क स्पीड मिळेल. त्यामुळे 5G इंटरनेटसाठी 5G स्मार्ठफोन आवश्यक आहे.


5G स्पीड कसा असेल?


5G इंटरनेटमुळे तुम्हाला अवघ्या काही सेकंदांमध्ये चित्रपट डाउनलोड करता येतील. टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पीडबाबत चाचण्या केल्या आहेत. ज्यामध्ये 5G चा स्पीडचा चांगला अनुभव आला आहे. एअरटेलने (Airtel) 5Gच्या चाचणीमध्ये 3000 एमबीपीएस पर्यंतचा वेग मिळवला होता. तर व्हीआयने (Vodafone-idea) 3.7 Gbps पर्यंत स्पीड गाठला होता. तर, जिओला 5G नेटवर्कच्या टेस्टमध्ये 1000 एमबीपीएस पर्यंतचा स्पीड मिळाला आहे. 


5G ची किंमत काय असेल?


रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) या कंपन्या 4G च्या किंमतीमध्ये 5G इंटरनेट सेवा देण्याची शक्यता आहे. 5G इंटरनेट सेवा 4G पेक्षा 20 टक्क्यांपर्यंत महाग असू शकते. त्यामुळे सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रम लिलावात मोठी रक्कम गुंतवल्याचं म्हटलं जातं आहे. आता भारतात 5G च्या किंमती काय असतील हे पाहावे लागेल.