5G Services : अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर देशात आजपासून 5G सेवांचा शुभारंभ होत आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या उपस्थितीत प्रमुख शहरांमध्ये 5G सेवेचा शुभारंभ होणार आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ होणार आहे. त्यासोबतच सहाव्या भारतीय मोबाईल परिषद 2022 (IMC-2022) चे उदघाटनही होणार आहे. IMC “ नवे डिजीटल विश्व” या संकल्पनेसह 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान या भारतीय मोबाईल परिषद – 2022 चे उद्घाटन होणार आहे. 


भारतामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) यासारख्या टेलिकॉप कंपन्यांनी याआधी दिवाळीमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला भारतामधील प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे. पण या 5G सेवेमुळे इंटरनेटचा वेग किती वाढणार...? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच... तर जाणून घेऊयात त्याबद्दल


5G काय आहे?
5G चा फुल फॉर्म Fifth Generation म्हणजेच पाचवी पिढी असा आहे. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशनची पाचवी पिढी म्हणून ओळखली जाणार आहे. त्यासोबतच वायरलेस नेटवर्कची सुध्दा पाचवी पिढी म्हणून ओळखली जाणार आहे. 2G , 3G , 4G पेक्षा 5G अधिक वेगवान असेल. सध्याच्या 4जी एलटीई (4G LTE) नेटवर्कच्या तुलनेत 5G अधिक वेगानं आणि अधिक डिवाइसमध्ये चालण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातोय.  5G नेटवर्क 2018 मध्ये USA आणि जगभरातील अनेक प्रमुख देशात सुरु करण्यात आले.  5जी चं नेटवर्कही व्यवस्थित काम करेल. 5जी तीन बँड्समध्ये काम करते.  लो बँड, मिड आणि हाय फ्रीक्वेंसी बँड स्पेक्ट्रम.


5G चा वेग किती?
CNN च्या एका रिपोर्ट्सनुसार, वायरलेस इंडस्ट्री ट्रेड ग्रुप GSMA यांनी सांगितलं की 5जी नेटवर्क सध्याच्या 4G LTE पेक्षा कमीतकमी 10 पटीने वेगानं इंटरनेट स्पीड देईल.  रिपोर्ट्समध्ये असेही म्हटलेय की,  5 जी इंटरनेट फक्त दहा पटीने वेगानं चालेल, असे नाही. ते 100 पट स्पीडपर्यंतही वाढू शकते. इतर रिपोर्ट्सनुसार, 5G चा जास्तीत जास्त  इंटरनेट स्पीड 10 गीगाबाइट प्रति सेकेंद (GBPS) असू शकतो. 4G हा स्पीड 100 मेगाबाइट प्रति सेकेंद आहे. 4G च्या तुलनेत दहा पटीने वेगानं 5G चालेल, असा दावा 5G लाँच होण्याआधीच केला जातोय. पण वास्तिविकपणे 5G सेवेत आल्यानंतरच त्याचा वेगावरुन पडदा उठणार आहे.  


किती वेळात चित्रपट डाऊनलोड होणार?
जर तुम्ही चित्रपट पाहण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. कारण, 5G आल्यानंतर अवघ्या दहा सेंकदात संपूर्ण चित्रपट डाऊनलोड होऊ शकतो. 4जी इंटरनेटमध्ये सध्या चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी पाच ते दहा मिनिटांचा कालावधी लागतो. हा वेगही तुमच्या डिवायसवर अवलंबून आहे. 5जी मुळे तुमचं इंटरनेट अधिक वेगानं चालणार आहे. तसेच एका क्षणामध्येच मोठी फाईलही डाऊनलोडड होऊ शकते.