मुंबई : अॅपल या जगप्रसिद्ध कंपनीचा आयफोन SE मार्च महिन्यात लॉन्च झाला. त्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी आयफोन SE अधिकृतरित्या भारतीय बाजारपेठेतही लॉन्च करण्यात आला. 4 इंचाच्या या आयफोनमध्ये आयफोन 6S चे अनेक फीचर्स, तर काही नवे फीचर्सही समाविष्ट करण्यात आले आहेत. मात्र, आयफोन SE मध्ये नसलेल्या पाच गोष्टी सांगणार आहोत.
3D टच : सध्याच्या स्मार्टफोनप्रेमींना आकर्षित करणारं 3D टच फीचर अॅपलच्या या नव्या आयफोन SE मध्ये नाही. आयफोन 6S आणि आयफोन 6S Plus या फोनमध्ये हे फीचर होतं. त्यामुळे आयफोनप्रेमींसाठी 3D टचची सवय होती. मात्र, हे फीचर अॅपलने आयफोन SE मध्ये समाविष्ट केले नाहीत.
काँट्रॅस्ट रेशो : जेव्हा काँट्रॅस्ट रेशोचा मुद्दा येतो, त्यावेळीही आयफोन SE मागे पडतो. कारण आयफोन 6S मध्ये 1400:1 असा काँट्रॅस्ट रेशो आहे, तर आयफोन SE मध्ये केवळ 800:1 असा रेशो आहे.
स्क्रीन साईज : हल्ली अनेक टेक्नोसॅव्ही स्क्रीन साईज मोठी असावी, म्हणून मोठ्या स्क्रीनचे मोबाईल किंवा टॅब्लेटला पसंती देतात. मात्र, अॅपलच्या आयफोन SE मध्ये नेमकी याचीच कमी आहे. आयफोन SE चा स्क्रीन केवळ 4 इंचाचा आहे. आयफोन 6S चा स्क्रीन 4.7 इंच, तर आयफोन 6S Plus चा स्क्रीन 5.5 इंच आहे. त्याचवेळी पिक्सेलही कमी आहेत. आयफोन SE ला 1334×750 रिझॉल्युशन आहे. तर पिक्सेल डेन्सिटी 401 ppi आहे.
हाय रिझॉल्युशन फ्रंट फेसिंग कॅमेरा : सध्या सेल्फीचं युग आहे. हल्ली अनेकजण फ्रंट फेसिंग कॅमेरा किंवा ज्याला सेल्फी कॅमेरा म्हटलं जातं, ते पाहून फोन खरेदी केली जाते. आयफोन SE ला रिअर कॅमेरा 12 मेगापिक्सेल, तर फ्रंट फेसिंग कॅमेरा केवळ 1.2 मेगापिक्सेल आहे. त्यामुळे सेल्फीची क्वालिटी काय असेल, हे वेगळं सांगायला नको.
स्टोरेज कपॅसिटी : तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्टोरेज कपॅसिटी किती आहे, याचं महत्त्व हल्ली वाढलं आहे. आयफोन SE मध्ये स्टोरेज कपॅसिटीमध्ये केवळ दोनच व्हेरिएंट आहेत, एक 16 जीबी आणि दुसरं 64 जीबीचं.