नंदूरबार : सायबर गुन्हेगारीवर वचक बसवण्याबरोबरच अशा गुन्ह्यांची तात्काळ उकल करुन आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्ताल यांच्या क्षेत्रात ‘सायबरलॅब’ सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सायबर लॅबचे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी, एकाच दिवशी राज्यातील 44 ठिकाणी उद्घाटन होणार आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ई-बॅंकिंग, पेपरलेस कार्यालय, सोशल मिडिया आदींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यातून आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरुन गुन्हे करण्याच्या विविध युक्त्या सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जात आहेत, या गुन्ह्यांना आळा घालण्या बरोबरच हे गुन्हे करणाऱ्यांना वचक बसावा, यादृष्टीने गृहविभागाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ‘सायबरलॅब’ उभारण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे.
सर्व जिल्हे, पोलीस आयुक्तालयांसह मुंबई, पुणे आणि नागपूर रेल्वे कार्यक्षेत्रात 44 विविध ठिकाणी ‘सायबरलॅब’ ची उभारणी करुन गृहविभागाने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.