मुंबई : संपूर्ण देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा (raman effect)शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये "राष्ट्रीय विज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक भारतीयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हे होय.

सर्वच भारतीयांना देशाचे नागरिक म्हणून आपले हक्क माहीत असतात. पण फारसं कुणालाच हे माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे. आज भारताने विज्ञानात प्रचंड प्रगती केलीय. अंतराळातील मोहिमांमध्ये गणल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या पाचमध्ये भारताचा क्रमांक लागतो. या प्रगतीसोबत ज्याप्रमाणात भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजायला हवा होता त्या प्रमाणात मात्र तो दिसत नाहीय.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचं काय?
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे. जो आपल्याकडे होताना दिसत नाही. आपण 'विज्ञानयुग' आहे असं म्हणतो, कारण गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षात, विज्ञानाची प्रगती फार प्रचंड वेगानं झालीय. हातातल्या मोबाईलमध्ये आता सर्व जग सामावलं आहे. सध्या जवळपास सर्वच क्षेत्रात विज्ञानाने प्रगती केल्याचं पाहायला मिळतंय. परिणामी मनुष्याचं जीवन अधिक सुकर होत आहे. या प्रगतीसोबत जो वैज्ञानिक दृष्टीकोन यायला हवा होता. तो मात्र अजूनही लोकांमध्ये पुरेशा प्रमाणात दिसत नाही. अजूनही अंधश्रद्धेचा पगडा आपल्यावर मोठ्या प्रमाणात असलेला दिसतोय.

सी. व्ही. रामन : रविंद्रनाथ टागोरांनंतर नोबेल मिळवणारे दुसरे भारतीय -
सी. व्ही. रामन यांचा तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर 1788 जन्म झाला. रामन यांचे शिक्षण चेन्नई येथे झालं. भौतिक शास्त्रातील आपल्या संशोधनामध्ये त्यांना रामन इफेक्टचा शोध लावला. याच संशोधनातून पुढे रामन स्कॅटरींगचा शोध लागला. जेव्हा एखादा प्रकाशाचा किरण धुळ कण विरहीत, पारदर्शक रासायनिक संयोगातून जातो त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणाच्या विरुद्ध दिशेला तयार होतो. हा पसरलेला प्रकाशाचे किरण एकाच तरंगाचे असतात. मात्र, काही प्रकाश किरण हे सोडण्यात आलेल्या प्रकाशाच्या किरणांहून वेगळ्या तरंगाचे असतात यालाच रामन इफेक्ट असे म्हणतात.

रामन यांना ब्रिटनमधील राजाने सर ही पदवी बहाल केली. तसेच 1930 साली भौतिक शास्त्रातील संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. रविंद्रनाथ टागोरांनंतर नोबेल पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. त्यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. तेथेच त्यांनी भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख पद भूषवले. तसेच 1947 साली ते बंगळुरुमधील रामन संशोधन संस्थेचे संचालक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठांना उभारणीत रामन यांचा मोलाचा वाट होता. त्यांच्या या कामगीरीसाठी त्यांना 1954 साली भारत सरकारकडून भारतरत्न या सर्वौच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 21 नोव्हेंबर 1970 रोजी त्यांचे बंगळुरुमध्ये निधन झाले.

Science Exhibition | विरारच्या उत्कर्ष विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन, 'उडणारे यान आणि चांद्रयान 2' खास आकर्षण