TCS Bribe For Jobs Case : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) या बड्या आयटी कंपनीतील नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी (TCS Recruitment Case) मोठी कारवाई करण्यात आली आहे. टीसीएसकडून घोटाळ्यातील एकूण 19 जणांवर कारवाई केली आहे. 16 कर्मचाऱ्यांना कंपनीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी नोकरीवरुन काढून टाकलं आहे. तर तीन कर्मचाऱ्यांना रिसोर्स मॅनेजमेंट प्रक्रियेतून बाजूला केल्याची माहिती आहे. 


एका व्हिसल ब्लोअरने कंपनीच्या सीईओ आणि सीओओला पत्र लिहून आरएमजीचे ग्लोबल हेड ईएस चक्रवर्ती उमेदवारांना नियुक्ती देताना स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेत आहेत असा दावा केला होता. या आरोपांच्या चौकशीसाठी कंपनीकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली गेली होती. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.  


या चौकशी दरम्यान टीसीएसमधील मॅनेजर लेव्हलच्या एकाही कर्मचाऱ्याचा सहभाग नसल्याचं स्पष्ट झालं आहे. टीसीएस 6 व्हेंडर्स, त्यांचे मालक आणि त्यांच्याशी संलग्न कंपन्यांशी इथून पुढे कोणताही व्यवसाय करणार नसल्याचं स्पष्ट करत ही कारवाई करण्यात आली आहे. 


कमिशनमधून 100 कोटी कमावल्याचा होता आरोप


गेल्या तीन वर्षांत टीसीएसनं कंत्राटी भरतीसह तीन लाख लोकांना कामावर घेतले होते. या भरती प्रक्रियेत घोटाळा करून त्यात सहभागी असलेल्यांनी कमिशनच्या माध्यमातून किमान 100 कोटी रुपये कमावले असावेत असा दावा करण्यात आला होता.  टीसीएसकडून याप्रकरणी स्पष्टीकरण देताना कंपनीचा यात कोणताही सहभाग नसल्याचं सांगत कोणतंही आर्थिक नुकसान झालं नसल्याचं सांगितलं होतं. सोबतच टीसीएसचे काही कर्मचारी आणि स्टाफिंग फर्मच्या कर्मचाऱ्यांकडून कंपनीच्या नियमांचा भंग केला असल्याचं सांगितलं होतं.


भरती प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर टीसीएसने आपल्या भरती प्रमुखांना रजेवर पाठवले होते आणि चार आरएमजी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे होतं. सोबतच तीन स्टाफिंग फर्मवर बंदी घातली होती. आता 16 जणांना घरचा रस्ता दाखवला आहे तर तिघांना व्यवस्थापन प्रक्रियेतून बाजूला केलं आहे. 


देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीच्या 28 व्या सभेला संबोधित करताना टाटा सन्स (Tata Sons) चे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले होते की, 'TCS त्याच्या पुरवठादार व्यवस्थापन प्रक्रियेचे पुनरावलोकन करेल आणि नियम अधिक कडक करेल. यामुळे कंपनीत नुकत्याच झालेल्या नोकरीतील घोटाळ्यासारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची खात्री देता येईल.'  


ही बातमी वाचा: