नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) रेल्वेमार्गे सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा (Gold Smuggling Racket) पर्दाफाश केला आहे. देशभरात तीन ठिकाणी एकत्रित कारवाई करत 19 कोटीं रुपयाचं सोनं जप्त केलं आहे. वाराणसी, नागपूर आणि मुंबईत ही कारवाई करण्यात आली.
डीआरआयच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावरून 8 किलो 500 ग्रॅम गोल्ड बिस्कीटसह दोघांना अटक केली आहे. नागपूरसह देशभरात तीन ठिकाणी कारवाई करत तब्बल 19 कोटी रुपयांचे सोनं जप्त केले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाकडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.
रस्ते आणि रेल्वे मार्गांद्वारे विदेशी सोन्याची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence) अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गेल्या काही दिवसात पाळत ठेऊन तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या प्रकरणी गोल्ड तस्करी करणाऱ्या मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.
नागपूरसह वाराणसी आणि मुंबईत नियोजित आणि सुव्यवस्थितपणे ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात सुमारे 31.7 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 19 कोटी रुपये आहे. या प्रकरणी तिन्ही ठिकाणी मिळून 11 तस्करांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 13 व 14 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आली आहे.
नागपुरात पुणे- हावडा दरम्यान धावणाऱ्या आजाद हिंद एक्सप्रेस मध्ये दोन आरोपी सोने घेऊन येत असल्याची अत्यंत गोपनीय माहिती महसुल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना समजली होती. दोन्ही आरोपीना नागपूर रेल्वे स्टेशन वर उतरवण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे 8.5 किलो इतक्या वजनाचे सोने आढळून आले. डीआरआय पथकाने रेल्वे सुरक्षा पथकाच्या मदतीने दोघांना अटक केली आहे.
ही बातमी वाचा :