Operation Sindoor: पहेलगाम दहशतवादी हल्याच्या (Pahalgam Terror Attack) बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी भरातीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' राबावत दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रयदात्या पाकिस्तानला जबर हादरा दिला आहे. सोबतच भारतीय लष्कराने अतिशय चोख प्रत्युत्तर देत आपल्या  लष्करी सामर्थांची एक चुणूक जगाला दाखवून दिली. मात्र असे होत असता मायभूमीसाठी सर्वोच्च त्याग आणि समर्पण देणाऱ्या एका सैनिकाला वीरमरण प्राप्त झाले आहे. जम्मू आणि काश्मीर मधील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सुभेदार मेजर पवन कुमार (Subedar Major Pawan Kumar) हे शहीद झालेत.

दरम्यान, रविवारी हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कांगडा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पूर्ण शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) व्हाईट नाईट कॉर्प्स लेफ्टनंट जनरल पी के मिश्रा आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केलं. तर कुटुंबातील सदस्य, मित्र आणि मोठ्या संख्येने शोकाकुल नागरिकांनी त्यांना अश्रूंनी निरोप दिला आणि “सुभेदार मेजर पवन कुमार अमर रहे” अशा घोषणा दिल्या. 

अटल धैर्याला सलाम, भारतीय लष्कराकडूनही श्रद्धांजली अर्पण

दरम्यान, यावेळी सुभेदार मेजर पवन कुमार यांच्या मुलाने अंत्यसंस्काराच्या चितेला अग्नी दिला. यावेळी सर्वत्र शोककळा पसरली होती. तर कुटुंबातील सदस्य, मित्र आणि मोठ्या संख्येने जमेलेल्या शोकाकुल लोकांनी त्यांना अश्रूंनी निरोप दिला आणि “सुभेदार मेजर पवन कुमार अमर रहे” आणि “पाकिस्तान विरोधी घोषणा दिल्या. तर भारतीय लष्कराकडूनही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कॉर्प्सने X वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत म्हटले की "#GOC आणि #WhiteKnightCorps चे सर्व रँक #OpSindoor दरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्या #Braveheart सुभेदार मेजर पवन कुमार यांच्या अटल धैर्याला सलाम करतात. त्यांचे शौर्य आणि कर्तव्याप्रती समर्पण नेहमीच लक्षात ठेवले जाईल. आम्ही त्यांच्या दुःखाच्या वेळी शोकग्रस्त कुटुंबासोबत उभे आहोत," असे कॉर्प्सने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले आहे.

सुभेदार मेजर पवन कुमार यांचे तिरंग्यात गुंडाळलेले पार्थिव रविवारी दुपारी 1 वाजता जम्मूहून शाहपूर येथे आणण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी ते स्वीकारले. तेव्हा सर्वत्र शोककळा पसरली. यावेळी हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांनी राज्य सरकारच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. कृषी मंत्री चंदर कुमार, उपउपयुक्त हेमराज बैरवा आणि पोलिस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनीही पुष्पांजली वाहिली. माजी विधानसभेचे अध्यक्ष विपिन परमार, माजी मंत्री सर्वीन चौधरी आणि माजी आमदार अरुण कुमार हे श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.

देश त्यांच्या धाडसाचे कायम ऋणी राहील- मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू 

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "देश त्यांच्या धाडसाचे कायम ऋणी राहील. या दुःखाच्या वेळी राज्य सरकार त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे." सुभेदार मेजर पवन कुमार हे शाहपूरमधील वॉर्ड क्रमांक 4चे रहिवासी होते आणि त्यांनी 25 पंजाब रेजिमेंटमध्ये सेवा बजावली होती. त्यांचे वडील गराज सिंग हे भारतीय सैन्यातील निवृत्त हवालदार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचे पालक, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

हे ही वाचा