मुंबई : भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा (Pakistan) दहशतवादी चेहरा उघडा पडला. पाकिस्तानच्या एअर डिफेन्समधली भगदाडं उघडी पडली. पाकिस्तानच्या न्युक्लिअर युद्धाच्या धमकीतील फोलपणा उघडा पडला आणि उघडा पडला तो प्रत्येक देश, ज्याने दहशतवादी (Terrorist) पाकिस्तानला भारताविरोधात मदत केली आणि ती सुद्धा साधी सुधी मदत नाही तर लष्करी मदत, आर्थिक मदत. या देशांमध्ये सर्वात मोठं नाव अर्थातच चीन त्यानंतर टर्की किंवा तुर्कस्थान आहे. चीनने भारतविरोध कधीच लपवून ठेवलेला नाही, त्यामुळे चीनने पाकिस्तानला आर्थिक, सैनिकी, तांत्रिक सगळी मदत करुन अक्षरश: अंकित केलं आहे. चीनने पाकिस्तानला मदत केल्याचं भारताला फार काही आश्चर्य वाटल नाही पण तुर्कस्तान (Turkiya) हे सरप्राईज पॅकेज ठरलं. पहलगाम हल्ल्यानंतर तुर्कस्तान पाकिस्तानसोबत ठामपणे उभा राहिला. काश्मीरप्रश्न असो किंवा भारत विरोधी कारवाया, तुर्कस्तान कायम पाकिस्तानच्या बचावासाठी तत्परतेनं पुढे आला आहे. पाकिस्तान आणि तुर्कस्थानचं नातं समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल.
तुर्कस्तान-पाकिस्तान नातं भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जन्माला आलं. तुर्कस्तानातील खलिफाला सर्व मुस्लिमांचा प्रमुख मानलं जातं. त्यावेळच्या हिंदुस्थानातील मुस्लिमांचा ओढा ऑटोमन साम्राज्याकडे आणि तुर्कस्तानच्या खलीफाकडे होता. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी आणि मित्र राष्ट्रांनी तुर्कीचा, ऑटोमन साम्राज्याचा दारुण पराभव केला. नंतर ब्रिटिशांनी ऑटोमन साम्राज्य खालसा केले, तुर्कस्थानचे तुकडे करण्याचं ठरवल्यावर जगभरातील, त्यातही अखंड हिंदुस्थानातील मुस्लिम दुखी झाले. खलीफाला हटवण्याच्या विरोधात सगळे मुस्लिम एक झाले, भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली. मुस्लिमांनी असहकार चळवळीला साथ द्यावी म्हणून महात्मा गांधींनी खिलाफत चळवळीला पाठींबा दिला. अखंड हिंदुस्थानातील मुस्लिमांनी तुर्कस्तानला जमेल ती मदत केली, धर्माच्या नावावर भारताची फाळणी झाली, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा जन्म झाला. इथल्या मुस्लिमांनी खलिफासाठी दिलेला पाठींबा तुर्कस्थानने कायम लक्षात ठेवला. त्यानंतर तुर्कस्तान-पाकिस्तान हे नातं घट्ट होत गेलं
आशियाचा इस्लामी देशांचे नेता बनायचं
तुर्कस्तानला आशियातील इस्लामी देशांचा नेता बनायचं आहे. त्यासाठी एर्डोगान पाकिस्तान, मलेशिया अशा देशांची मोट बांधत आहे. तुर्कस्तानने काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम पाठींबा दिलाय. गेल्या काही दशकात या दोन्ही देशात लष्करी देवाणघेवाण वाढली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने जे ड्रोन पाठवले होते ते तुर्कस्थानचे होते. भारताने त्या ड्रोनचे हवेतच तुकडे केले हा भाग वेगळा.
चीन खालोखाल पाकिस्तानला तुर्कस्तान लष्करी मदत करतो किंवा अझरबैजान मदत करतो असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. चीनखालोखाल पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशाचं नाव आहे नेदरलँड. सागरी युद्धासाठीची नेदरलँड मदत करत आला आहे. दोनच महिन्यांपूर्वी भारताने नेदरलँड्सला याबाबत चेतावणी सुद्धा दिली होती. गेल्या दहा बारा वर्षात नेदरलँड्सने पाकला हजार दीड हजार कोटी रुपयांचं लष्करी साहित्य निर्यात केलं आहे. नेदरलँड्सच्या संरक्षणमंत्र्यांनी राजनाथ सिंह यांनी पाकची जिहादी नीती समजून सांगितली होती. हजार बाराशे कोटी आकडा छोटा वाटत असला तरी पाकला वातावरण अस्थिर करायला पुरेसा आहे.
पाकिस्तानला लष्करी मदत करणारे देश, पाकच्या लष्करी आयातीत कोणाचा वाटा?
चीन - 81 टक्केनेदरलँन्ड्स- 5.5 टक्केतुर्की -3.8 टक्के
अमेरिकेकडून पाकिस्तानचा वापर
एक गोष्ट विसरुन चालणार नाहीय ती म्हणजे अमेरिका दीर्घ काळ पाकिस्तानचा वापर करत आला आहे, कुख्यात जिहादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडेपर्यंत पाक अमेरिकेच्या मित्र यादीतच होता. त्या बदल्यात प्रचंड म्हणजे अब्जावधी डॉलर्सची आर्थिक मदत आणि तंत्रज्ञान पुरवत आला आहे. ज्याचा वापर पाकिस्तानने भारतविरोधी दहशतवादासाठी केला आहे. ज्या एफ-16 चा सतत उल्लेख होतो, ती अमेरिकेचीच देण आहे हे विसरुन चालणार नाही. आम्हाला अमेरिकेनं वापरलं, इंग्लंडने वापरलं, पाश्चात्य देशांनी वापरलं हे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आंतरराष्ट्रीय चॅनलवर निर्लज्जपणे सांगतात ते याच कारणामुळे. दहशतवादी पाकिस्तान रोग नेशन म्हणून कुप्रसिद्ध आहे, कधी कोणाच्या मित्र यादीत असेल सांगता येत नाही. त्यामुळे भारताने आपली मित्र यादी सतत चेक करत राहणे आणि अपग्रेड करत राहणे महत्वाचं राहणार आहे. पाकिस्तान आणि त्याच्या स्वार्थी मित्रांना कसा धडा शिकवायचा याचा वेगळं नियोजन भारताला करावं लागणार आहे.
भूकंपात भारत तुर्कस्तानच्या मदतीला धावला
आपले खरे मित्र कोण,छुपे शत्रू कोण,विश्वासघात करणारे कोण, पाठीत खंजीर खुपसणारे गद्दार कोण, याचं खरं चित्र ऑपरेशन सिंदूरमुळे स्पष्ट झालं आहे दहशतवादी पाकिस्तान इतकेच त्याला मदत करणारे देशही भारताच्या आणि भारतीयांच्या रडारवर आले आहेत. त्यातले दोन प्रमुख नावं आहेत तुर्कस्तान आणि अझरबैजान. या दोन्ही देशांवर भारतीयांनी बहिष्काराचा सर्जिकल स्ट्राईक सुरु केला आहे. तुर्की सफरचंदानंतर मसाले-सुकामेवा संघटनेनंही तुर्कीच्या मालावर बहिष्कार टाकला आहे. खरं तर 2023 साली तुर्कस्तानात मोठा भूकंप आला, 50 हजार पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. तेव्हा भारताने ऑपरेशन दोस्त राबवलं. तुर्कीला होता होईल तेवढी मदत पुरवली. भूकंपाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी मदत केली. तुर्कीने त्या उपकाराची परतफेड म्हणून दहशतवादी पाकिस्तानला भारतावर हल्ला करण्यासाठी मदत केली. फक्त 300-400 ड्रोन, कार्गो विमान, तंत्रज्ञानच नाही तर तुर्कीने आपले सैनिकही पाठवले. ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन तुर्की सैनिक मारले गेल्याची माहिती आहे.
तुर्कीवर बहिष्कारासाठी भारतीयांचा पुढाकार
उघडपणे पाकिस्तानला मदत करणाऱ्या दोन्ही देशांच्या विरोधात भारतीय पर्यटकांनीही पुढाकार घेतला आहे. सतत पाकिस्तानसोबत उभा राहणाऱ्या तुर्कस्तानच्या गद्दारीचा भारताने एक एक करत हिशेब लिहायला घेतला आहे. भारतातल्या काही विमानतळावर ग्राउंड सपोर्ट देणाऱ्या सेलेबी या तुर्की कंपनीसोबतचे भारतातील करार रद्द करण्यात आले आहेत. सेलेबी सोबत असलेले साधारण चार हजार मराठी कामगार बेरोजगार झाले होते त्या सर्वांना कंटिन्यू करण्याचा निर्णय विमान प्राधिकरणाने घेतला आहे. यानंतर तुर्कस्तानी एअरलाइन्सदेखील संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत नातं तोडण्याची तयारी भारताने सुरु केली आहे. इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस यांचा करार असेल किंवा भारतात सुरु असलेले पुणे मेट्रोसारखे प्रकल्प, यांचा पुनर्विचार केला जाऊ शकतो. पुणे मेट्रोसह देशात सुरत, कानपुर आणि भोपाळ मेट्रो बनवण्याची कंत्राटं गुलेरम्याक या तुर्कस्तानमधील कंपनीला देण्यात आली आहेत.
पाकला मदत, तुर्की कंपन्यांना दट्ट्या!
1. सेलेबी कंपनीनंतर तुर्कीच्या गुलेरमॅक कंपनीची कंत्राटंही धोक्यात2. गुलेरमॅक कंपनीला पुणे,सुरत,कानपूर आणि भोपाळ मेट्रोच्या कामाची कंत्राटं3. भारतीय KPILसोबत भोपाळ मेट्रोचे बोगदे तयार करण्यासाठी 769 कोटींचे कंत्राट4. जे. कुमार बिटवेलसोबत सुरत मेट्रोचे 1 हजार 073 कोटींचं कंत्राट5. KPILसोबत कानपूर मेट्रोचं 762 कोटींचं कंत्राट6. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडसोबत पुणे मेट्रोचे 2 हजार 283 कोटींचं कंत्राट
व्यापार आणि दहशतवाद एकाच वेळी सुरू राहू शकत नाही हे भारतानं दहशतवादाची फॅक्टरी असलेल्या पाकला ठणकावून सांगितलं आहे. फक्त धर्माच्या नावावर दहशतवादी पाकची पाठराखण करणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजान सारख्या देशांच्या ढोंगी नेत्यांना तोच धडा शिकवण्याची हीच वेळ आहे.
हेही वाचा
टीम इंडियाच्या आजच्या स्तरावरील क्रिकेटचं श्रेय पवार साहेबांचं; वानखेडेवर फडणवीसांची जोरदार 'बॅटींग'
